मालवणात ‘भगवा चषक’ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजन

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दि. ८ ते १२ मार्च या कालावधीत मालवण मधील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील खुली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा दिवस-रात्र खेळविण्यात येणार असून विजेता, उपविजेता यासह इतर बक्षिसांसह एकूण १० लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषदेत दिली.

मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेस हरी खोबरेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहराध्यक्ष बाबी जोगी, नंदू गवंडी, मंदार केणी, यतीन खोत, युवासेना शहराध्यक्ष मंदार ओरसकर, महेश जावकर, तपस्वी मयेकर, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, उमेश मांजरेकर, बंटी केरकर, पंकज सादये, गौरव वेर्लेकर, संमेश परब, फारुख मुकादम, सिद्धेश मांजरेकर, किरण वाळके, उमेश चव्हाण, सुहास वालावलकर, करण खडपे, चेतन खोत, प्रथमेश राऊत आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मालवणात शिवसेनेतर्फे कबड्डी व इतर स्पर्धा होत असतात. मात्र यावेळी शिवसेनेकडून मालवणात प्रथमच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण ३२ संघ तसेच टेनिसबॉल क्रिकेट मधील राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी होणार आहेत, ही स्पर्धा भव्य दिव्य होणार आहे, एक वेगळेपण आम्ही दाखवून देणार असून मैदानात भगवे वातावरण असणार आहे, असे यावेळी हरी खोबरेकर यांनी सांगितले.

या स्पर्धेतील विजेत्या संघास १लाख ४८ रुपये (१,०००,४८/-) व चषक तर उपविजेत्या संघास १ लाख ५० हजार ४८ रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी किरण वाळके, शाम वाक्कर व बंटी केरकर – ९६३७२३२१९२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी हरी खोबरेकर यांनी केले.

You cannot copy content of this page