राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सलोनी मेस्त्री प्रथम

नेहरू युवा केंद्र, साद टीम आणि यारा फाउंडेशनचा उपक्रम

⚡कणकवली ता.२८-: प्रजासत्ताक दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, साद टीम कणकवली आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श संगीत विद्यालय कणकवली येथे राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सलोनी महेश मेस्त्री यांच्या ‘जयोस्तुते’ या गीताला प्रथम क्रमांक मिळाला तर मृणाल मिलिंद गावकर यांच्या ‘बलसागर भारत होवो’ आणि पूनम दिलीप गुजर यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ या गीताला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त झाला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा तुमच्यातल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ आहे. सुरांच्या माध्यमातून जागविलेली देशभक्ती कायम स्मरणात ठेवा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

साद टीमच्या आणि यारा फाउंडेशनच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक उपक्रम आणि शिबिरे आयोजित केली जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेला जिल्हाभरातून स्पर्धकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी कवी, प्राथमिक शिक्षक किशोर कदम, आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक संदीप पेंडुरकर, तेजस्विता पेंडुरकर, माजी नगरसेविका सुविधा साटम यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धकांच्या गीताला संदीप पेंडुरकर, मेघपर्ण एकावडे, वेदांत कुयेस्कर यांची सुरेख संगीत साथ लाभली. संविधान संवादक आणि नेहरू युवा केंद्राचे देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून आणि मान्यवरांच्या हस्ते देवी शारदेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साद टीमचे सदस्य विशाल गुरव यांनी मांडले. तर आभार प्रदर्शन साद टीम अध्यक्ष श्रेयश शिंदे यांनी केले. प्रेरणा चिंदरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव, साद टीम अध्यक्ष श्रेयश अरविंद शिंदे, यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, नितीन मेस्त्री, विशाल गुरव, वृदाली हजारे, प्रियांका मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page