मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने घेतला निर्णय
मालवण (प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या समुद्री हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व एलईडी नौकांवर कारवाई न झाल्यास दि. २६ जानेवारी पासून आंदोलन छेडण्याचा इशारा मच्छीमार नेते व मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष बाबी जोगी यांनी मत्स्य व्यवसाय विभागास दिला असताना याबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी पर्ससीन व एलईडी मासेमारीवर कारवाई करण्यासाठी सागर सुरक्षा पथके तयार करून इतर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगत आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन केल्याने बाबी जोगी यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे पर्ससीन व एलईडी लाईट द्वारे मासेमारीचे प्रमाण वाढले असल्याने याबाबत बाबी जोगी यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधत याबाबत कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची मत्स्य विभागाने दखल घेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांनी बाबी जोगी यांना शासकीय पत्र पाठवत पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारीवरील करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश २०२१ अंतर्गत राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात (१२ नॉटीकल मैल पर्यंत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात येते. एल.ई.डी व पर्ससीन नेट मार्फत बेकायदेशीररित्या होणारी मासेमारी रोखण्यासाठी विभागाकडून प्राप्त गस्ती नौकेच्या सहाय्याने समुद्रात प्राधिकृत अंमलबजावणी अधिकारी यांचेमार्फत नियमितपणे व काटेकोरपणे रात्र – -दिवस गस्त घालण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सन २०२२-२३ या वर्षांत एकूण १८ नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारण अध्यादेश २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण महसूल रक्कम रुपये १२,०३,१२९/- शासन जमा करण्यात आला आहे. सदर नौकांपैकी एकूण ७ नौकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एलईडी नौका सामग्री व जनरेटर देखील जप्त करण्यात आले आहेत.
अनधिकृत पर्ससीन व एलईडी नौकांवर बंदरात व समुद्रात कारवाई करणेकरिता तालुकानिहाय अधिकारी कर्मचारी व सागरी सुरक्षा रक्षक यांची पथके तयार करण्यात आली असून त्यांना उचित कार्यवाही करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. अनधिकृत पर्ससीन व एलईडी नौकांवर कारवाई करणेकरिता विभागामार्फत सर्व उपाययोजना करण्यात आहेत, तरी २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांनी बाबी जोगी यांना दिले आहे. या पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, मुंबई विभाग प्रादेशिक उपयुक्त, मालवण तहसीलदार, मालवण पोलीस निरीक्षक, परवाना अधिकारी यांनाही पाठवून माहिती देण्यात आली आहे.
