कवी अजय कांडर यांच्या दीर्घ काव्यसंग्रहाचे 28 रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.२५-: कवी अजय कांडर यांच्या पुणे हर्मिस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बहुचर्चित अशा “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार 28 जानेवारी रोजी दु. 2 वा. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात येणार असल्याची माहिती सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.
या संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांची प्रस्तावना लाभली आहे. आता बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे 28 आणि 29 जानेवारी या कालावधीमध्ये ‘गांधी जागर” या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सदर “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ काव्यसंग्रहावर ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत हेमंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री देसाई यांच्या हस्ते “अजूनही जिवंत आहे गांधी” या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
गांधींनी स्वदेशीचा विचार दिला, आपण मात्र आपली भूमीच नापीक केली. गांधीजींनी जात आणि धर्माचा राजकारणासाठी कधीच उपयोग केला नाही. आज मात्र गांधींच्या नावालाच प्रतिरोध करत “जात आणि धर्मा”चं हिणकस राजकारण केलं जातंय. अखेर हे एवढं टोकाला गेले आहे, की एका बाजूला संख्येने अल्प असलेला विचारशील भारत, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य हिंसक भारत, अशी स्पष्ट विभागणी झालेली दिसते. हे सर्व पाहता अंतिमत: आज पुन्हा गांधी विचारांचीच कास धरल्याशिवाय देशापुढे दुसरा पर्याय नाही. अशी मांडणी “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ संग्रहात करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात साहित्य आणि शिक्षणशास्त्रचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक डॉ. नवनाथ तुपे, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक मुकुंद कुळे, आजरा येथील लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते कॉ. संपत देसाई, लेखक आणि संपादक सुशील धसकटे अजूनही जिवंत आहे गांधी या संग्रहावर मांडणी करणार आहेत. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील प्रा.प्रिया सुशील करणार आहेत. तरी साहित्य रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले असून अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर- कार्यवाहक सेवांगण- (94 22 94 62 12) यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page