⚡मालवण ता.२४-: मालवण तालुक्यातील देऊळवाडा आंगणेवाडी येथे प्रस्तावित धरण ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ कोटी अनुदान रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले असून उर्वरीत रक्कम लवकरच प्राप्त होईल. धरण लवकर पूर्ण होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी आंगणेवाडी येथे व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, अरुण लाड, विजय पालव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, धरणाबाबत शेवटची नोटिफिकेशन दिलेली असून त्याची मुदत १ फेब्रुवारी पर्यत आहे. संपूर्ण जागेचे अनुदान ११ कोटी निश्चित करण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश होईल. भराडी देवीच्या कृपेने धरण लवकर पूर्ण होईल. धरणातील पाणी लिफ्ट करून आंगणेवाडीला कायमस्वरूपी देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प राबवला जाईल, अशी माहितीही खासदार विनायक राऊत यांनी दिली.
