मडुऱ्यात नवीन वाहिनी घालून वीज पुरवठा सुरळीत…

पिंट्या परब यांच्या प्रयत्नांना यश

*💫बांदा दि.१२-:* बुधवारी रात्रो मडुरा परबवाडी येथील जीर्ण झालेली विद्युतभारीत वाहिनी तिसऱ्यांदा तुटल्याचा प्रकार घडला आहे. रात्रीची वेळ असल्याने धोका टळला, परंतु पुन्हा तीच वाहिनी जोडणी करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मात्र ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्राहकांची आक्रमकता पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नवीन वाहिनी घालण्याचा आदेश दिल्याने ग्रामस्थ शांत झाले. अखेर वीज कर्मचाऱ्यांनी जुनी वाहिनी बदलून नवीन वाहिनी घालून दुसऱ्या दिवशी गुरूवारी पुरवठा पूर्ववत सुरू केला. पावसाळ्यात सदर वाहिनी तुटून ये-जा करण्याच्या वाटेवर पडली होती. ग्रामस्थ पिंट्या परब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला होता. यावेळी रात्रीची वेळ असल्याने अपघात झाला नसल्याचे पिंट्या परब यांनी सांगितले. तसेच पडलेल्या तारेस अनेक ठिकाणी जोडण्या केलेल्या होत्या. त्याच तारेला अजून जोडणी करून पुन्हा ती वाहिनी घालण्यास आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिंट्या परब यांच्यासह ग्रामस्थांनी रोखले. वरिष्ठ अधिकारी अनिल यादव यांच्याशी संपर्क साधून हकीकत सांगितली. श्री.यादव यांनी तात्काळ जुनी वाहिनी बदलून नवीन वाहिनी घालण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला. त्यानंतर नवीन वाहिनी घालून पुरवठा सुरळीत करण्यात आला. ग्रामस्थ पिंट्या परब म्हणाले की, केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मडुरा गावात अनेक ठिकाणी वाहिन्यांना जॉईंट मारले आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी संपूर्ण पाहणी करून तसा अहवाल अधिकाऱ्यांना द्यावा व जीर्ण वाहिन्या तात्काळ बदलण्याची मागणी सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page