खा. राऊत यांच्या जीवितास धोका असल्याचे पोलिस अधीक्षकाना दिले शिवसैनिकांनी निवेदन*
सिंधूदुर्गनगरी ता १२ रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदार संघातील विद्यमान खा विनायक राऊत व माजी खा नीलेश राणे यांच्यातील वाद अधिक पेटला आहे. गेले चार दिवस शाब्दिक द्वद्व सुरु असतानाच शुक्रवारी ओरोस येथील खा राऊत यांच्या कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालत जोडे मारो आंदोलन केले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना नीलेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खा राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे निवेदन दिले. शिवसेना खा विनायक राऊत यानी नारायण राणे यांच्या सारख्या नॉन मॅट्रिकला केंद्रात मंत्री करण्याची वेळ भाजपवर आली आहे, अशी टिपण्णी केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार नीलेश राणे यानी ‘राऊत तुझे दिवस भरले आहेत. दिससील तिथे तुला मारणार’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर सेना आ वैभव नाईक यानी शिवसैनिकच नीलेश राणे यांना मारतील, असा इशारा दिला. यानंतर हा शाब्दिक वाद अधिकच रंगत गेला. आरोप-प्रत्यारोप रंगलेले असताना गुरुवारी जिल्हा प्रमुख संजय पडते यानी प्रेस घेत वेळ आणि ठिकाण सांगा, असा इशारा नीलेश राणे यांना दिला होता. आज शिवसेना अधिकच आक्रमक झाली. ओरोस येथील विनायक राऊत संपर्क कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या पुतळ्याला चप्पल हार घालत मारहाण केली. तसेच पोलिस अधीक्षक यांना निवेदन देत नीलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे सिंधूदुर्गची शांतता भंग झाली आहे. तसेच नीलेश राणे यांचे कार्यकर्ते सोशल मिडियावर राऊत यांच्या विरोधात भाष्य करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, असे नमूद केले आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जान्हवी सावंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
