शून्य टक्के अपघात प्रमाण आणुया

मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील यांचे आवाहन

बांदा/प्रतिनिधी
रस्ते अपघातात बळी जाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. यासाठी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित राष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर वाहतुकीच्या नियमांसाठी दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित समाज घडवूया, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी येथे केले.
येथील खेमराज मेमोरीयल प्रशालेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच्या (आरटीओ) वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अनिल मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक अनिल पावसकर, ‘सकाळ’चे प्रतिनिधी निलेश मोरजकर, मुख्याध्यापिका माधवी सावंत, श्री. हळदणकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुलांना वाहतुकीच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी वाहन चालविताना कोणते कपडे परिधान करावेत, वाहनाची सुरक्षितता याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मुलांना नियमांचे पुस्तक वाटप करण्यात आले.
स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page