नागरिकांनी जंगलात जाताना सुरक्षितता घ्यावी;जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांचे आवाहन
बांदा/प्रतिनिधी
काजुचा हंगाम सुरु झाला असून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात माकडतापाचे रुग्ण सापडत आहेत. दूषित गोचीड चावल्याने या तापाचा प्रसार होत असून वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी जंगलात जाताना सुरक्षितात घ्यावी, तसेच तापाची लक्षणें आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी येथे केले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, वनविभाग, खासगी डॉक्टर यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य केंद्राच्या आवारात माकडताप जनजागृतीचे व घ्यावयाच्या काळजीचे माहिती फलक लावण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पशूविकास अधिकारी डॉ. अजित मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. टी. आर. चिपळूणकर, नीरवडे आरोग्य केंद्राचे डॉ. विक्रम मस्के, आंबोली आरोग्य केंद्राचे डॉ. महेश जाधव, मळेवाड आरोग्य केंद्राच्या डॉ. अदिती ठाकर, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. आर. वालावलकर, दोडामार्ग वनपाल संग्राम जितकर, सागर किनळेकर, पशुधन सहाय्यक मधुकर दाभाडे, दोडामार्ग विस्तार अधिकारी एस. बी. शेळके, सावंतवाडी विस्तार अधिकारी जी. के. भोई, बांदा वनरक्षक संतोष देसाई, माकडताप विभागाचे सहाय्यक सेवक, तपासनीस, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.
यावेळी माकडताप बाधित क्षेत्रात जनजागृती करण्याचे तसेच लोकांना आरोग्यविषयक जागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ताप आल्यानंतर घेण्यात येणारे उपचार, औषधे, जंगलात जाण्यापूर्वी अंगाला लावण्यात येणारे डीएमपी ऑइल, मृत माकडाची विल्हेवाट याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
