समर्पित भक्तीभावाने युक्त जीवन एक उत्सव बनते : माता सुदीक्षाजी महाराज

⚡कणकवली ता.१८-: ‘सदोदित समर्पितपणे भक्तीभावाने युक्त होऊन जगलेले जीवन हे एक उत्सव बनून जाते असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती पर्व समागम’ मध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. भक्ती पर्व समागमामध्ये मुख्यत्वे करुन परम संत संतोख सिंहजी व अन्य भक्तांनी मिशनसाठी केलेल्या तप-त्यागपूर्ण जीवनाचे स्मरण केले जाते. हा कार्यक्रम देश-विदेशामध्ये आयोजित करण्यात आला.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असलदे येथे तर ओरोस सेक्टरमधील नेमळे, सावंतवाडी या ठिकाणी स.१० ते ०१ या वेळेत भक्ती पर्व सत्संग समारोह संपन्न झाला.यावेळी जिल्ह्यातील निरंकारी भक्तांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
भक्तीची परिभाषा समजावताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सहज-सुंदर जीवन जगून आनंदाची अवस्था प्राप्त करणे हीच यथार्थ भक्ती होय. यामध्ये चतुराई किंवा चलाखीला कोणतेही स्थान नाही. पूर्णपणे समर्पित होणे हीच भक्तीची पराकाष्टा होय. भक्ती हा प्रत्येकाचा स्वत:चा प्रवास असून या प्रभूशी एकरूप होण्याचा एक सरळ मार्ग आहे. अशा भक्तीनेच जीवन सार्थक बनते आणि भौतिक दिखावटीपासून आपण मुक्त होतो. भक्तीभावनेने ओतप्रोत जीवन जगणारा संत साध्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो. भौतिक जगाची चमक-दमक त्याच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. इतरांचे दु:ख समजून घेऊन तो त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव बाळगतो. त्याचे जीवन वाहत्या नदीसारखे निर्मळ असते.
शेवटी, सद्गुरु माताजींनी समस्त भक्तगणांना भक्तीमार्गावर अग्रेसर होण्याची प्रेरणा दिली आणि पुरातन संतांच्या भक्तीभावनेतून प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page