आतापर्यंत ८२६ शेतकऱ्यांनी ९८५८.६० क्विंटल भाताची केली विक्री;खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे यांची माहिती
सावंतवाडी दि.१४ जानेवारी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाकडून आधारभूत किंमतीत भात खरेदी करण्यात येत असून आतापर्यंत ८२६ शेतकऱ्यांकडून ९८५८.६० क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारी पर्यंत भात खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी जलद गतीने भात विक्री केंद्रावर भात देऊन सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले आहे.
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली यावेळी येत्या ३१ जानेवारी पर्यंत भात खरेदी करण्याची शेवटची तारीख असल्याचे सूचित करण्यात आले. त्यानंतर चेअरमन प्रमोद गावडे यांनी शेतकऱ्यांनी आपले भात येत्या ३१ जानेवारीपर्यंत केंद्रावर आणून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, कोलगाव, डेगवे, मडुरा, भेडशी, इन्सुली या केंद्रावर भात खरेदी केली जात आहे असे त्यांनी सांगितले. सावंतवाडी केंद्रावर १९० शेतकऱ्यांकडून २४४९.८८ क्विंटल, मळगाव केंद्रावर १९३ शेतकऱ्यांकडून २१९३-६७ क्विंटल, मळेवाड केंद्रावर ९७ शेतकऱ्यांकडून १२०३.२० क्विंटल, तळवडे येथे ७६ शेतकऱ्यांकडून ६९६.४७ क्विंटल, कोलगाव ९४ शेतकऱ्यांकडून १५९३ क्विंटल, डेगवे ३९ शेतकऱ्यांकडून ५२६.०३ क्विंटल, मडुरा ६ शेतकऱ्यांकडून ४७.६० क्विंटल, भेडशी ८१ शेतकऱ्यांकडून ७१५.५४ क्विंटल तर इन्सुली ५० शेतकऱ्यांकडून ४३३.२१ क्विंटल असे ९ केंद्रावर ८२६ लाभार्थी शेतकऱ्यांकडून ९८५८.६० क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे, असे गावडे यांनी सांगितले.
यंदा लांबलेल्या पावसामुळे भात कापणी व भात मळणी उशिरा झाली आहे त्यामुळे भात केंद्रावर भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत हवी आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या या केंद्रावर ३१ जानेवारी पर्यंत विक्री करून लाभार्थी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना प्रमोद गावडे म्हणाले, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम व अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे ही मुदत वाढवून मिळावी म्हणून खरेदी विक्री संघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांनी ३१ जानेवारी ही शेवटची तारीख आहे असे समजून केंद्रावर जलद गतीने भात आणावे असे आवाहन गावडे यांनी केले आहे.
