स्पर्धक पंचायत समितींच्या गुणांक अहवाल व दाखल्यांची फेर तपासणी करावी

माजी सभापती सुनील घाडीगांवकर ; मालवण पंचायत समितीची सभा

*💫मालवण दि.१०-:* यशवंतराज अभियानात मालवण पंचायत समितीने उत्तम कामगिरी करूनही सदोष गुणांकन, दाखल्यांमुळे आमचा प्रथम क्रमांक एक-दोन गुणांमुळे हुकवला जातो. त्यामुळे स्पर्धक पंचायत समितींच्या गुणांक अहवाल व दाखल्यांची फेर तपासणी करण्यात यावी, असा ठराव माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी मालवण पंचायत समितीच्या सभेत घेतला. दरम्यान, पंचायतराज अभियानाच्या गुणांकनाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असून त्यानंतर पोलखोल करू, असे सभापती अजिंक्य पाताडे यांनी स्पष्ट केले. मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जाधव, श्याम चव्हाण यांच्यासह सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, सुनील घाडीगावकर, गायत्री ठाकूर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सोनाली कोदे, सागरिका लाड तसेच विविध खात्याचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यशवंत पंचायत राज अभियानात मालवण पंचायत समिती मधील माहिती इथलेच कर्मचारी दुसऱ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पोहचवत आहेत असे कमलाकर गावडे यांनी सांगितले. यावर बोलताना सुनील घाडीगांवकर यांनी माहिती पोहचविणारे संशयित कर्मचारी कोण आहेत हे आपल्याला माहीत असल्याचे सांगत पुन्हा अशी माहिती दुसरीकडे पोहचविताना कर्मचारी रंगेहाथ सापडल्यास त्यांना सोडणार नाही असा इशारा घाडीगांवकर यांनी दिला. ओवळीये गावाचा कार्यभार नसताना पशुवैद्यकीय विभागाच्या एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका शेळीचा मृत्यू झाला तर अन्य सहा शेळ्या मरणाच्या दारात आहेत. त्यामुळे ‘त्या’ डॉक्टरची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्या डॉक्टरबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्याची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी सुनील घाडीगावकर यांनी करत सात शेळ्यांची नुकसान भरपाई संबंधित लाभार्थ्याला मिळायलाच हवी, अशी भूमिका घेतली. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच अन्य शासकीय कार्यालयांची बिले भरमसाठ आल्याचे गावडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावेळी सुधारित शासन निर्णयानुसार घरगुती दरानुसार बिले काढण्याच्या सूचना बीडीओ जाधव यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या. तर मधुरा चोपडेकर यांनी देवबाग मार्गावर एसटी प्रशासनाकडून नियमित बससेवा सुरू नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘स्वच्छता पंधरावडा अभियान’ च्या माध्यमातून मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व उपसभापती राजू परुळेकर यांनी यावेळी सभेत दिली. यावेळी पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी या उपक्रमास पाठींबा दर्शवला. किल्ले सिंधुदुर्गसह, मसुरे भरतगड, चिंदर भगवंतगड, ओवळीये सिद्धगड तसेच कुडोपी माळरानावर असलेला कातळशिल्प ठेवा यासह मालवण तालुक्यातील अन्य ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

You cannot copy content of this page