बांदा शहरासाठी मिजी अग्निशामक बंब द्यावा

सरपंच प्रियांका नाईक यांची पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी

बांदा/प्रतिनिधी
बांदा हे वेगाने विकसित होणारे शहर असून शहरात बाजरीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात बाजारात आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. यासाठी शहरात मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी बांदा शहरातील विविध विकासकमांबाबत चर्चा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र -गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा शहर वसले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक व मोठी बाजारपेठ बांदा आहे. बांदा शहरावर आजूबाजूचे ३० ते ४० गाव अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात बांदा शहर व दशक्रोशीत अग्निशमन बंबाच्या कमतरतेमुळे कित्येक एकर क्षेत्रातील शेती बागायती जळून खाक झाल्या आहेत. शहरात दुकानाना आग लागून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेले अग्निशमन बंब हे वेळेत उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागते. यासाठी आपल्या माध्यमातून बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करून मिळावा.
तसेच बांदा शहरात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने शासकीय दाखल्यांसाठी लागणार वर्तणुकीचा दाखला मिळण्यासाठी लोकांना त्रास होत आहे. यासाठी तात्काळ पोलीस पाटील पद भरावे अशीही मागणी करण्यात आली. यावेळी शहरातील नियोजित तसेच संकल्पित विविध विकासकामांची चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, बाळू सावंत, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, मकरंद तोरसकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी बांदा शहरासाठी प्रधान्याने अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याचे तसेच शहरातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page