सिंधूदुर्गनगरी ताब१० सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. दोन्ही चोरी प्रकरणातील संशयित आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकांनी एकाला कोल्हापुरातून तर दुसऱ्याला कलमठ येथून ताब्यात घेतले आहे. तसेच कलमठ चोरी प्रकरणातील काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुंबई महामार्ग लगत असलेल्या बालाजी मार्बल येथील महिंद्रा बोलेरो पिकप एम एच ०७ पी २६११ ही कार अज्ञात आरोपीने १० ते १२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत चोरून नेली होती. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कणकवली तालुक्यातील बीडयेवाडी येथे एका घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा घरात प्रवेश करून आतील लॅपटॉप, मोबाईल व इतर कागदपत्रे असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हाही १० ते १२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला होता. या चोरी प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके तैनात केली होती. त्यानुसार या पथकांनी आपला तपास सुरू केला होता. कुडाळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात एलसीबिला कोल्हापूर येथील इसमाने ही चोरी केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने कोल्हापूर येथे जात खुदबुद्दीन मुजावर (४५) रा. सुभाषनगर याला कोल्हापूर जवाहरनगर येथून ताब्यात घेतले आहे. तसेच कणकवली पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मिळालेल्या माहितीनुसार तपास काम करून एलसीबी च्या पथकाने लालजिभाई भूतभाई सोलंकी (३०) रा. गुजरात सध्या रा. कलमठ यांनी ही चोरी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानुसार या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अधिक तपास केला असता त्याच्याकडून चोरीस गेलेल्या १२ हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कणकवली शहर, कलमठ परिसरात घडलेले गुन्हे उघडकीस येण्यासाठी या आरोपींला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया करून देण्यात आली.
चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश
