श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यास अध्यक्ष सयाजी सकपाळ व पदाधिकारी यांचा इशारा
⚡मालवण ता.०४-: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर होऊनही या मंदिराचे काम गेली चार वर्षे रडतरखडत सुरू आहे. मंदिराच्या कामाबाबत सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे व प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात असून मंदिराचे अर्धवट राहिलेले काम महिन्याभरात सुरू न झाल्यास अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किल्ले सिंधुदुर्गमधील श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यासचे अध्यक्ष सयाजी सकपाळ व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मालवण भरड येथील हॉटेल ओअसिस येथे आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवराजेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सयाजी सकपाळ, देवस्थान न्यासचे विश्वस्त राजा खांडाळेकर, किशोर पाडावे, प्रदीप वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी राजा खांडाळेकर म्हणाले, किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामास शासनाकडून १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध ही झाला आहे. यातून केवळ मंदिरातील खांबाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र इतर कामांना अद्यापही सुरवात झालेली नाही. मंदिराच्या बाजूला बसविण्यात आलेल्या फरशा उखडून टाकण्यात आल्या आहेत. सध्या पर्यटन हंगाम सुरू असताना येथील दयनीय अवस्था पाहून पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर ठिकठिकाणी झाडेझुडपे, वेली वाढल्या आहेत. या झाडांची मुळे तटबंदीत खोलवर शिरून तटबंदीचे अतोनात नुकसान होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे असलेला लाकडी दरवाजा सध्या जीर्ण अवस्थेत असून तो कोणत्याही क्षणी कोसळला अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाज्याची दुरुस्ती करून तो पुन्हा पूर्ववत करणे आवश्यक बनले आहे. समुद्राच्या लाटांच्या माराने प्रवेशद्वाराकडच्या दगडाने बांधलेल्या जेटीची झीज झाली आहे. अनेक दगड निखळून पडले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठे खड्डे पडले असून तेथून चालणे अशक्य होत आहे. या परिसराची लवकरात लवकर पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे, असेही खांडाळेकर म्हणाले.
सिंधुदुर्ग किल्ल्यास दरवर्षी पाच लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे किल्ल्यात ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा साचत आहे. ४५ एकर क्षेत्रफळाच्या किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत तर्फे केवळ एका स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुरेशा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करून किल्ला परिसरात प्लास्टिक बंदी राबविली पाहिजे. किल्ल्यात दैनंदिन पूजाअर्चा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व भवानी माता यांच्या पाषाण मूर्तींची कालामान प्रमाणे झिज होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसार मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने याबाबतची कार्यवाही व्हायला हवी. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तातडीने पाहणी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी किशोर पाडावे यांनी यावेळी केली.
सिंधुदुर्ग किल्ल्यास लाखो पर्यटक भेट देत असून वायरी भुतनाथ ग्रामपंचायत प्रत्येक पर्यटकामागे ५ रु. याप्रमाणे लाखो रुपयांचा कर गोळा करते. या कराच्या माध्यमातून ७५ टक्के रक्कम किल्ल्यातील स्वच्छता, पाणी तसेच अन्य कामांसाठी खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असतानाही त्याची कार्यवाही होत नसल्याने किल्ल्यात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
किल्ल्याच्या आणि मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात ही कामे मार्गी न लागल्यास देवस्थान न्यास व सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघाच्या वतीने अन्नत्याग उपोषण छेडले जाईल, असा इशारा श्री. सकपाळ यांनी दिला.
