बांदिवडे ते फोंडाघाट दरम्यान विनापरवाना वाहतूक करणारा डंपर घेतला ताब्यात
⚡मालवण ता.२८-: अनधिकृत वाळू उत्खनन आणि विनापरवाना वाळू वाहतुकीवर मालवणच्या महसूल विभागाने धडक कारवाईची पावले उचलली असून काल मंगळवारी रात्री बांदिवडे येथून फोंडाघाटच्या दिशेने वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर (एमएच ०७ एक्स ०३७२) पोईप येथे महसुलच्या पथकाने पकडून ताब्यात घेतला. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
डंपर चालक गणपत रामचंद्र कडू (बांदिवडे) हा आपल्या ताब्यातील डंपर मध्ये बांदिवडे येथे वाळू भरून फोंडाघाट च्या दिशेने निघाला. डंपर पोईप येथे आला असता महसूलच्या पथकाने हा डंपर अडविला. या डंपर मध्ये २ ब्रास वाळू सापडून आली. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने हा डंपर महसूलच्या पथकाने ताब्यात घेऊन मालवण तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवला आहे.
ही कारवाई तहसीलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार नागेश शिंदे, मंडळ अधिकारी राजेंद्र शिंगाडे यांच्या पथकाने केली.
मालवण तालुक्यात कालावल आणि कर्ली खाडी पात्रात अनधिकृत वाळू उपसा व वाळू वाहतूक सुरू आहे. याविरोधात महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. काल चिंदर वड येथे वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाने पकडला होता. आज पोईप येथे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला आहे. तसेच कर्ली खाडीपात्रात देवली कोरजाई येथेही सुरू असलेल्या वाळू उत्खनन ठिकाणी महसूल विभागाने धडक दिली. मात्र अधिकारी आल्याचे कळताच खाडीत वाळू उपसा करणाऱ्या बोटींमधील कामगारांनी पळ काढला.
