नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारावर संजू परब यांचा संताप कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी, ता. १९-: सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे अशुद्ध पाणी मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरोघरी दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील जुन्या पाणीपुरवठा पाईपलाईन नेमक्या कुठून गेल्या आहेत, याबाबत नगरपरिषदेकडे स्पष्ट नकाशे अथवा नियोजन उपलब्ध नसल्याने अशा समस्या निर्माण होत असल्याचा आरोप परब यांनी केला. उपवनसंरक्षक कार्यालय व तहसीलदार कार्यालयासमोर खोदून ठेवण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामाबाबतही त्यांनी प्रशासनाचा निषेध करत हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. दरम्यान, शहरात ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या तसेच एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनसाठी विविध ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे योग्य पद्धतीने रिस्टोरेशन करण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे व चर निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा संपल्याने प्रशासनाने तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी संजू परब यांनी केली. सध्या गॅस पाईपलाईनच्या खड्ड्यांमध्ये पुन्हा खोदाई करून ड्रेनेज पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी नगरसेविका सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. या पाहणीदरम्यान प्रभाग क्रमांक ८ मधील ज्ञानेश्वर पाटकर, ओंकार सावंत, शाम रेमुळकर, अथर्व सावंत, विनोद सावंत, प्रवीण मोरजकर, राजू भाट, अमित आरवारी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दूषित पाण्याच्या समस्येवर प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.”
