⚡मालवण ता.२७-: कांदळगाव मधील मागील पाच वर्षाचा विकास कामांचा आलेख हा मालवणातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उल्लेखनीय झाला आहे. तसेच बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली असून ती कामेही मार्गी लागणार असल्याने आपण समाधानी असल्याचे मत कांदळगावच्या माजी सरपंच उमदी परब यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या पाच वर्षाच्या काळात कांदळगाव मध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली. यात रस्ते, स्मशानभूमी मार्ग, साकव, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती या कामांबरोबर तीर्थक्षेत्र पर्यटन क दर्जा प्राप्त करून दरवर्षी गावाला विकास कामांसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. महिलांसाठी विविध उपक्रम घेण्याबरोबरच आठवडा बाजार, मुलांसाठी सांस्कृतिक साहित्य, दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. याच बरोबर गावातील उर्वरित रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला आहे. ही कामेही लवकरच मार्गी लागतील. त्याचबरोबर कांदळगाव कदमवाडी नळ योजना दुरुस्ती, ग्रामपंचायत ते आयकर घर नळपाणी योजना, खांबडवाडी नळ पाणी योजना, ओझर येथे भव्य प्रवेशद्वार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, साळकरवाडी येथे कांदळवन बोटिंग, देऊळवाडी येथे नाट्यगृह, कांदळगाव ग्रामपंचायत वर सुसज्ज हॉल, वाचनालय, ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण, बीएसएनएल टॉवर अशी विविध कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून येत्या वर्षभरात ही कामे मार्गे लागतील.
कोरोनाचा खडतर काळात विकासकामांवर परिणाम झाला होता. मात्र या काळातही सर्व सहकारी सदस्य, माजी सभापती उदय परब, ग्रामसेवक श्री. पेठे, सागर देसाई यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक तसेच मुंबई स्थित ग्रामस्थांचे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभले. सरपंच पदाच्या काळात जास्तीत जास्त विकासात्मक कामे मार्गी लावताना ग्रामस्थांच्या विश्वास सार्थकी लावता आला. त्यामुळे आपण पूर्ण समाधानी असल्याचे सौ. परब यांनी स्पष्ट केले.
