⚡वेंगुर्ला ता.२७-: मठ येथील रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम २४ डिसेंबर संपन्न झाला. याच दिवशी रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्मदिन असल्याने जयंतीचाही कार्यक्रम घेण्यात आला.
हायस्कूलच्या नविन इमारतीमधील रायसाहेब मधुसूदन विष्णु खानोलकर सभागृहात सकाळच्या सत्रात रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ.खानोलकर यांच्या जीवनाचा आढावा घेणारी भाषणे सादर केली. तर यावेळी उपस्थित असलेले सरपंच तुळशीदास ठाकूर, नवनिर्वाचित सदस्य नित्यानंद शेणई, मिलिद खानोलकर, मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनीही डॉ.खानोलकर यांच्या जीवनावर भाषणे केली.
सायंकाळी काजू उद्योजक दीपक ठाकूर, जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधिक्षक एन.पी.मठकर, सरपंच तुळशीदास ठाकूर, श्रीकृष्ण खानोलकर, मिलिद खानोलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष समिर गडेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सतिश गावडे, नुतन मराठा हितवर्धक संघाचे सदस्य वसंत परुळेकर, रामदास खानोलकर, मिहिर खानोलकर, शालेय मुख्यमंत्री ईशा ठाकूर यांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झाला. यावेळी आठवी ते दहावीमधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त, चालू वर्षातील शाळांतर्गत विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एकूण चार हजार ७५० रुपयांची ही पारितोषिके दीपक ठाकूर यांनी पुरस्कृत केली होती. आदर्श विद्यार्थी व आदर्श क्रिडापटू यांनाही सन्मानचिन्ह व खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात आली.
एका प्रयत्नांत सर्व प्राप्त होईलचे असे नाही, म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. हार न मानता जास्तीत जास्त प्रयत्न करुन यश संपाद करा असे दीपक ठाकूर यांनी तर माझ्यासारखे तुम्हीही मोठे व्हा आणि भविष्यात शाळेमध्ये सन्मानाने येण्याचा मान मिळवा असे एन.पी.मठकर यांनी सांगितले.
अहवाल वाचन एस.बी.कांबळी, सूत्रसंचालन जी.एम.गोसावी तर आभार डी.ए.देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल वाढोकार, दिगंबर मोबारकर, नरेंद्र नाईक, अनिकेत कांबळे यांच्यासह सर्व विद्यार्थी आणि जिमखाना मंत्रिमंडळाने सहकार्य केले. त्यानंतर मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले.
