पुण्याहून स्पेअर पार्ट मागविला; दोन दिवसांत यंत्रणा पूर्ववत होण्याची शक्यता, राजू मसुरकर यांची माहिती..

⚡सावंतवाडी, ता. २२-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहाचे कोल्ड स्टोरेज (शव शीतपेटी) बंद पडल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले. या प्रकाराची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी पुणे येथील मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर कंपनीचे तंत्रज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.
यंत्रणेची तपासणी केली असता कोल्ड स्टोरेज मशिनरीमधील सेन्सर खराब झाल्याचे निदर्शनास आले. हा स्पेअर पार्ट पुणे येथून मागविण्यात आला असून, तो दोन दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सेन्सर बसविल्यानंतर शवगृहातील कोल्ड स्टोरेजची सुविधा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून आमदार दीपक केसरकर यांनी आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली अतिरिक्त शव शीतपेटी उपलब्ध आहे. तसेच सावंतवाडी भटवाडी-निरुखे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सहा शवगृह कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध असून वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचीही व्यवस्था आहे. या सुविधेसाठी ३ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते, अशी माहिती मसुरकर यांनी दिली. शवगृहातील कोल्ड स्टोरेज लवकरात लवकर सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.”
