क्रिकेटपटूंना सरावासाठी मिळणार अधिक सुसज्ज मैदान; आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता. २२-: सावंतवाडी येथील जिमखाना मैदान क्रिकेटपटूंसाठी अधिक सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून ग्रास कटर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशीनचा शुभारंभ आज नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिमखाना मैदानावर शहरातील तसेच परिसरातील अनेक क्रिकेटपटू नियमितपणे सराव करतात. तसेच विविध क्रिकेट सामन्यांचे आयोजनही या मैदानावर केले जाते. मैदानावरील गवत व्यवस्थित ठेवणे आणि मैदानाची देखभाल करणे यासाठी नगरपरिषदेने ग्रास कटर मशीन उपलब्ध करून दिल्याने क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या मशीनच्या माध्यमातून मैदानावरील गवताची नियमित कटिंग करून मैदान अधिक चांगल्या पद्धतीने देखभाल करता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात जिमखाना मैदानावर अधिक दर्जेदार क्रिकेट सामने व स्पर्धांचे आयोजन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, पेडणेकर तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.”
