⚡सावंतवाडी ता.२२-: मुंबई–सावंतवाडी दरम्यान नव्याने सुरू झालेल्या १५०८७/१५०८८ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरून कोकणातील रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः १५०८७ मुंबई–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात कुडाळ ते सावंतवाडी दरम्यान तब्बल तीन तासांचा स्लॅक टाईम ठेवण्यात आल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या वेळापत्रकामुळे गाडीच्या प्रवासाचा कालावधी वाढण्याबरोबरच प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुडाळ ते सावंतवाडी या कमी अंतराच्या प्रवासासाठी तीन तासांचा अतिरिक्त कालावधी ठेवण्याची आवश्यकता काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. या स्लॅक टाईमचा गैरवापर होऊन गाडीला अधिकृत वेळापत्रकानुसार उशीर होण्याची शक्यता निर्माण होईल, अशी भीतीही प्रवासी व्यक्त करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या वेळापत्रकाचे नियोजन नेमके कोणत्या निकषांवर केले, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.
सावंतवाडीहून सुटण्याच्या वेळेबाबतही प्रश्नचिन्ह
१५०८८ सावंतवाडी–मुंबई एक्स्प्रेसच्या वेळापत्रक बदलाच्या चर्चेमुळेही प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या गाडीच्या मुंबईतील आगमनाच्या वेळेत बदल करताना कोकणातील प्रवाशांच्या सोयीचा विचार करण्यात आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांच्या मते, सावंतवाडीहून ही गाडी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सोडली असती, तर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीचे झाले असते. मात्र, प्रस्तावित वेळापत्रकानुसार गाडी ठाणे येथे पहाटे चारच्या सुमारास आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सकाळी सहाच्या सुमारास पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना पहाटेच्या वेळी ठाणे येथे उतरावे लागण्याची किंवा पुढील प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
प्रवाशांच्या सोयीपेक्षा वेळापत्रकाला प्राधान्य..?
यापूर्वी ठाणे येथे सकाळी पावणेसहा वाजता पोहोचणारी वेळ प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीची होती, असे मत व्यक्त केले जात आहे. नव्या वेळापत्रकात मुंबईतील अंतिम स्थानकावर पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यास त्यामागील कारण काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करता, नव्या गाडीला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू नये, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे का, असा संशय काही प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाचा यामागील नेमका हेतू काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध नसताना या आरोपांना दुजोरा देता येणार नाही.
कोकणातील प्रवाशांना मुंबईपर्यंत जलद, आरामदायी आणि सोयीस्कर रेल्वेसेवा मिळावी, ही अपेक्षा आहे. त्यामुळे १५०८७/१५०८८ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचा फेरविचार करून प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, तसेच कुडाळ ते सावंतवाडी दरम्यान ठेवण्यात आलेल्या तीन तासांच्या स्लॅक टाईमबाबत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
