⚡सावंतवाडी ता.२२-: मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात पंचावन्न विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. पाच वर्षापासून पुढील विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचा पहिला राज्य पंच आणि राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सावंतवाडी रोटरी क्लबचे सचिव श्री.सुहास सातोसकर, ज्येष्ठ पत्रकार आणि सम्राट इंटरनॅशनल क्लबचे भावी अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र पवार, उदयोजक राजन पंदारे, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेत एकवीस पारितोषिके देण्यात आली. रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष प्रवीण परब यांनी पहिली ते चौथी गटाची पारितोषिके पुरस्कृत केली.
सुहास सातोसकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या उपक्रमांना शुभेच्छा देऊन ॲकेडमीला यापुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुक्ताई ॲकेडमीच्या सहकार्याने रोटरीतर्फे लवकरच जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हरिश्चंद्र पवार यांनी मुक्ताई ॲकेडमीने बुदधिबळमध्ये जिल्ह्यातुन एक ग्रँडमास्टर घडवावा अशी इच्छा व्यक्त केली. राजन पंदारे यांनी मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील तळागाळातील विदयार्थ्यांपर्यंत हे खेळ नेऊन विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विदयार्थ्यांना रोख रक्कम, चषक, मेडल, प्रशस्तीपत्र आणि सहभाग घेतलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

- पहिली ते चौथी – प्रथम पूर्वांक कोचरेकर, द्वितीय विघ्नेश अंबापूरकर, तृतीय धवल ठाकूर, चौथा ओजस पालकर, पाचवा रियांश मुळीक
मुलींमध्ये प्रथम दिव्यांका नार्वेकर - पाचवी ते सातवी – प्रथम यश सावंत, द्वितीय प्रज्वल नार्वेकर, तृतीय लिएण्डर पिंटो, चौथा हर्षवर्धन भराडी, पाचवा अवनिश वेंगुर्लेकर
मुलींमध्ये प्रथम प्रेरणा वाडकर - आठवी ते दहावी – प्रथम चिदानंद रेडकर, द्वितीय हर्ष राऊळ, तृतीय स्वरुप राऊळ, चौथा अथर्व वेंगुर्लेकर, पाचवा पुष्कर केळूसकर
मुलींमध्ये प्रथम गार्गी सावंत, द्वितीय श्रेया माणगावकर, तृतीय सलोनी चव्हाण
