Headlines

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा …

जि प सदस्य रुपेश पावसकर यांची मागणी:पिंगुळी-गोंधयाळेवाडीतील टोका प्रश्न गंभीर..

⚡कुडाळ ता.२२-: पिंगुळी-गोंधयाळेवाडीतील ग्रामस्थांना सध्या टोक्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. नजीकच्या एमआयडीसीत असलेल्या धान्य गोदामामुळे हे टोके वस्तीत आल्यामुळे ग्रामस्थाना होत असलेल्या त्रासाबाबत नेरूर-देऊळवाडाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पण तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी पाठवलेला अहवाल बदलण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी दिल्याचा गंभीर आरोप रुपेश पावसकर यांनी केला आहे. अहवाल बदलण्याचा आदेश देणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुपेश पावसकर यांनी एफडीइचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी आणि आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकड़े केली आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
रुपेश पावसकर यांनी सांगितले कि, पिंगुळी गोंधयाळेवाडीतल्या ग्रामस्थांना या टोक्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. टोक्याच्या त्रासामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. त्वचेला खाज येणे, टोक्यांच्या वाढत्या संख्येमुळे ऍलर्जी आणि खोकल्याचा त्रास होणे, टोके कानात जाणे, लहान मुलांना चावणे अशी तिथल्या नागरिकांची तक्रार आहे. याबाबत आरोग्य विभागाने पाहणी केली. परिस्थती मान्य करून आरोग्य विभागाने या टोक्यांमुळेच त्रास होत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे ज्या गोदामामुळे हा टोक्यांचा त्रास होतो आहे ते गोदाम बंद करण्याची मागणी केल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले.
यापूर्वी जेव्हा २०२४ मध्ये हा त्रास झाले होता तेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांना पत्र दिल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले. ते पत्र त्यांनी कुडाळच्या पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविले होते. कुडाळच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दिवसा कीटक आढळले नाहीत, मात्र रात्री कीटक आढळले. तसा अहवाल कुडाळच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवला. पण जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी या अहवालाचे दखल गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप रुपेश पावसकर यांनी केला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांची भेट घेतली असता हे जिल्हा पुरवठा अधिकारी खुर्चीत झोपले होते. खुर्चीत झोपणारा हा अधिकारी जिल्ह्याचा पुरवठा विभागाचा कारभार कसा करणार, असा संतप्त सवाल रुपेश पावसकर यांनी केला. जर टोक्याचा त्रास असलेला अहवाल तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला असेल तर तुम्ही तो अहवाल बदला, असे कसे सांगू शकता. असेही रुपेश पावसकर यांनी विचारले आहे. अशा चुकीच्या पद्धतीने जबाबदार पुरवठा अधिकारी वागत असेल तर अशा अधिकऱ्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे याना पत्र दिल्याचे रुपेश पावसकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page