अन्यथा जनआंदोलन करणार;भाजपा युवा मोर्चाच्या गौराग शेर्लेकर यांचा इशारा
बांदा/प्रतिनिधी
तेरेखोल नदीपात्रावर आळवाडी येथे जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडून मातीचा भराव टाकण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. बांदा शहरात येण्यासाठी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी या धोकादायक रस्त्याचा वापर करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका सदस्य गौरांग शेर्लेकर यांनी दिला आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेर्ले दशक्रोशीतील लोकांच्या मागणीनुसार या नदीपात्रावर पूल उभारण्यात आला. यावरून गतवर्षी दुचाकी वाहतूक देखील सुरु झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता न बनविता केवळ मातीचा भरावं टाकण्यात आला आहे. पुलावरून खाली उतरताना तीव्र उतार असल्याने याठिकाणी बरेच छोटे मोठे अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कित्येक दुचाकी चालक खाली चरात कोसळून जखमी झाले आहेत.
शेर्ले दशक्रोशीतून बांदा शहरात येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. मात्र रस्ता नसल्याने ही वाहतूक जीवावर बेतणारी ठरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
