आ वैभव नाईक;ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा केला सत्कार
मालवण (प्रतिनिधी)
राजकारणात पद मिळाल्यावर ऑफर व आमिषेही येतात, आपण शिवसेनेमुळेच आमदार झालो, आमदार नसतो तर मला ५० कोटींची व मंत्रिपदाची ऑफर आली नसती असे खळबळजनक विधान आम. वैभव नाईक यांनी करत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सरपंच व सदस्यांनाही आता पद मिळाल्याने अनेक ऑफर येतील, मात्र सरपंच व सदस्यांनी आपण शिवसेनेमुळेच निवडून आलो आणि यामागे अनेकांचे श्रम व आशीर्वाद आहेत हे कायम लक्षात ठेवून शिवसेनेशी प्रामाणिक राहावे, असे आमदार वैभव नाईक यांनी येथे बोलताना सांगितले. तसेच शिवसेनेचा सरपंच निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना आपण वर्षभरात प्रत्येकी २५ लाखांचा निधी तसेच ५ लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणाही यावेळी आम. नाईक यांनी केली.
मालवण तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आज वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल येथे आम. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी निवडून आलेल्या शिवसेना सरपंच व सदस्यांना आम. वैभव नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, मंदार केणी, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, मालवण कुडाळ युवतीसेना समन्वयक सौ. शिल्पा खोत, तालुका महिला आघाडीच्या सौ. दीपा शिंदे, भाई कासवकर, संमेश परब, किरण वाळके आदी व इतर उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संकट काळातून जात असतानाही जनतेने पक्षावर विश्वास दाखवून सरपंच व सदस्य निवडून दिले. पैशाने निवडणूका जिंकता येतात हे मालवण तालुक्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खोटे पाडले असून शिवसेनेने पैशाचा कोणताही वापर न करता जनतेने विश्वासाने शिवसेना उमेदवारांना निवडून दिले. तालुक्यात शिवसेनेचे २१ सरपंच निवडून आले असून गाव पॅनलचे सरपंच देखील लवकरच शिवसेनेत येऊन तालुक्यात सर्वाधिक सरपंच हे शिवसेनेचे असतील, असा दावा यावेळी आम. नाईक यांनी केला. आम. नाईक शिंदे गटात जाणार असे काहीजण सांगत आहेत, आम. नाईक सर्वानाच हवे आहेत, मात्र आमदारांना लोकांसमवेत राहायला आवडते, असा टोलाही आम. नाईक यांनी लगावला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला १०० टक्के यश मिळवायचे असून यासाठी प्रयत्न सुरू करूया, तसेच मालवण नगरपालिका निवडणूक देखील शिवसेना एकहाती जिंकेल असा विश्वास आम. नाईक यांनी व्यक्त केला. मालवण शहरात कोट्यावधीची विकासकामे झाली असून न झालेली विकासकामे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे आव्हान देखील आपण विरोधकांना दिले होते, असेही आम. नाईक म्हणाले.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, आम. वैभव नाईक व येथील शिवसैनिक आपल्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले आहे. विकासकामे केल्यानेच जनतेचे आशीर्वाद मिळतात, आम. नाईक यांनी गावागावात कोट्यावधीची विकास करत जनतेशी नाते टिकवून ठेवले आहे, जनसंपर्क कायम ठेवला. जिल्ह्यातील राजकीय अपप्रवृत्तीला गाडून टाकण्याचे काम त्यांनी केले म्हणूनच जायंट किलर म्हणून ओळखले जातात. निवडून आलेल्या सरपंचांनी गावचे नेतृत्व करतानाच तालुक्यातही नेतृत्व करावे. सत्तेची पोळी भाजून घेण्याचा राणे व भाजपचा प्रयत्न असून येत्या काळात सर्व सत्ता स्थानावर शिवसेनेचा भगवा फडकवूया असेही पारकर म्हणाले. यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, आज आम्ही ज्या सरपंच व सदस्यांचा सत्कार करत आहोत ते आमच्या पक्षाचे खरेखुरे सरपंच आहेत, इतरांप्रमाणे कोणत्याही सरपंच सदस्याला उभा करून हार घातले नाही. आम. वैभव नाईक हे शिवसेनेची सत्ता आलेल्या गावांना निधी देणार आहेतच, परंतु त्यांनी सत्ता नसलेल्या गावातही निधी द्यावा, गावांचा चांगला विकास व्हावा, असेही दुधवडकर म्हणाले. यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर, बाळ महभोज, मंदार केणी यांनीही विचार मांडले.
