शेतकरी संजय नाईक यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
⚡बांदा ता.२३-: सिंधुदुर्गातील रेडी, तिरोडा, साटेली, कळणे या लोहखनिजाच्या खाणीत सोने व प्लॅटेनियमचा अंश असल्याची चर्चा सर्वत्र असल्याने मोठमोठ्या कंपन्यांचे लक्ष या गावांकडे लागून आहेत. त्यामुळे भविष्यात साटेली(सावंतवाडी) गावात पुन्हा कोणतेही नियोजन न करता मायनिंग सूरू झाल्यास ग्रामस्थांसह पाळीव जनावरांनाही धोकादायक ठरू शकते. प्रशासनाने याची दखल घेण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी उपोषण छेडणार असल्याचा इशारा साटेली गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संजय नाईक यांनी दिला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात मोठ्या प्रमाणात मायनिंगचे उत्खनन करण्यात आले. सद्यस्थितीत काम बंद असले तरी मातीच्या ढिगाऱ्यांमुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. शेती-बागायती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून याला सर्वस्वी जबाबदार खनिकर्म विभाग आहे. मायनिंग गावात आणून सोन्याच्या विटांची थडगी बांधणार काय असे सांगत याविरोधात 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताकदिनी उपोषण छेडणार असल्याचा इशारा साटेली गावातील शेतकरी संजय नाईक यांनी दिला आहे.
साटेली गावातील शेती-बागायती आज नष्ट होत आहे. मायनिंगचे क्षेत्र पुढेपुढे सरकत असून ते मानवी जीवनासह प्राण्यांनाही धोकादायक बनले आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी येथील शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक केली व स्वतःमात्र करोडोंचे खनिज माती घेऊन गेले. धोकादायक स्थितीत मोठमोठे ढिगारे जीवीतास हानिकाकर ठरू शकतात. याकडे खनिकर्म विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या खनिकर्म विभागाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी उपोषण छेडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी सांगितले.
फोटो—–
संजय नाईक, शेतकरी
