ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवलीत आम. नितेश राणे यांच्या करिष्मा कायम

58 पैकी 40 ग्रा. प.वर वर्चस्व ;शिवसेना ठाकरे गटाला 11 ग्रामपंचायती; गाव पॅनलचे 5 ग्रा.प.; शिंदे गटाला 2 ग्रामपंचायती

⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुका हा राणे यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीत आम. नितेश राणे यांचा करिष्मा कायम राहिला आहे. 58 पैकी तब्बल 40 ग्रामपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा फडकला आहे. सत्ता गेल्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 11 ग्रामपंचायती मिळविलेले यश विशेष आहे. गाव विकास पॅनलच्या अधिपत्याखाली 5 ग्रामपंचायती आल्या आहेत.विशेष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खारेपाटण व फोंडाघाट या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर झाला त्यानुसार आज निकाल लागलेल्या व बिनविरोध झालेल्या 58 ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत 40, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 11 , बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडे 2 आणि गाव पॅनेलचे 5 ग्रामपंचायती मध्ये सरपंच विजयी झाले आहेत. गतवेळीच्या तुलनेत भाजपने 10 ग्रामपंचायत, शिवसेना ठाकरे गटाने 7 ग्रामपंचायतची सत्ता गमावली आहे निकाल जाहीर होताच सर्व पक्षिय कार्यकर्ते व नेत्यानी विजयी उमेदवारांचे स्वागत करत कणकवली तहसिल कार्यालया बाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

कणकवली तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या सत्ता असलेल्या दिगवळे, असलदे, आयनल, कोळोशी, कसवण, तळवडे, वाघेरी, शिवडाव, हरकुळ बुद्रुक या ग्रामपंचायतची सत्ता शिवसेना ठाकरे गटाकडे गेली तर शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या वागदे, बिडवाडी, हरकुळ खुर्द, ओसरगांव, कलमठ, हळवल, माईन या ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच व सदस्य विजयी झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता राखण्यात भाजपा आमदार नितेश राणे यांना यश आले आहे. कलमठ, नांदगाव, वागदे, या मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपने र्निविवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. वरवडे ग्रामपंचायतीत भाजपचे 2 गट आमने सामने होते यामध्ये प्रकाश सावंत गटाच्या करुणा अमोल घाडीगांवकर या विजयी तर सोनू सावंत गटाच्या श्रेया सचिन घाडीगांवकर पराभुत झाल्या. लक्षवेधी कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रामदास विखाळे (1530 मते) यांचा भाजपच्या संदीप मेस्त्री (2447 मते) यांनी 918 मतांनी पराभव केला आहे. तर कसवण तळवडे ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या मिलींद सर्पे यांनी भाजपच्या यशोधन सर्पे यांचा पराभव केला विशेष म्हणजे सरपंच एकमेव शिवसेनेचा तर सर्व सदस्य भाजपचे अशी अवस्था आहे. कासार्डे ग्रामपंचायतीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करताना सरपंचासहीत 13 ही जागा जिंकल्या आहेत. तर दारुम ग्रामपंचायत निवडणूकीत तेजस्वी लिंगायत या 21 वर्षीय या युवतीने पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवत सर्वात लहान वयाच्या सरपंच म्हणून मान मिळवला आहे. आयनल गावात शिवसेनेचा सरपंच विजयी झाला तर, भाजपचे 4 सदस्य विजयी झाले आहेत.

कणकवली तालुक्यातील सरपंच पदावर विजयी झालेले उमेदवार – आशिये : महेश गुरव (भाजप), चिंचवली : अशोक पाटील (गावपॅनल), पियाळी : पर्विण उर्फ बंड्या पन्हाळकर (भाजप), आयनल : सिध्दी दहिबांवकर (शिवसेना ठाकरे गट), दारिस्ते : सानिका गांवकर (भाजप), सातरल : सविता मेस्त्री (शिवसेना ठाकरे गट), सावडाव : आर्या वारंग (भाजप), दारुम : तेजस्वी लिंगायत 21 वर्षीय (गाव पॅनल), कसवण तळवडे : मिलींद सर्पे (शिवसेना ठाकरे गट), कुरंगवणे : संतोष ब्रम्हदंडे (भाजप), कासरल : स्नेहा परब (भाजप), कोळोशी : गुरुनाथ आचरेकर (शिवसेना ठाकरे गट), तिवरे : रविंद्र आंबेलकर (भाजप), बोर्डवे : वेदांगी पाताडे (भाजप) अवघ्या 3 मतांनी विजयी, बीडवाडी : पूजा चव्हाण (भाजप) अवघ्या 6 मतांनी विजयी, वरवडे : करुणा घाडीगांवकर (भाजप – प्रकाश सावंत गट), तरंदळे : सुशिल कदम (भाजप), शिवडाव : नितीश भिसे (शिवसेना ठाकरे गट), वाघेरी : अनुजा अनंत राणे (शिवसेना ठाकरे गट), हरकुळ खुर्द : राजन रासम (भाजप), करंजे : सपना मेस्त्री (भाजप), नागवे : सिध्दिका जाधव (भाजप), नरडवे: गणपत सावंत (भाजप), लोरे नं.1 :अजय रावराणे (भाजप), असलदे : चंद्रकांत डामरे (शिवसेना ठाकरे), जाणवली : अजित पवार (भाजप), दिगवळे : संतोष घाडीगांवकर (शिवसेना ठाकरे गट), कोंडये : ऋतुराज तेंडुलकर(भाजप), घोणसरी : मॅक्सी पिंटो (भाजप), हळवल : अर्पणा चव्हाण (भाजप), वागदे : संदीप सावंत (भाजप), हरकुळ बुद्रुक : आनंद ठाकुर (शिवसेना ठाकरे गट), कुंभवडे : विजया कानडे (शिवसेना ठाकरे गट), साळीस्ते : प्रभाकर ताम्हणकर (गाव पॅनल), तरळे : हनुमंत तळेकरल (भाजप), खारेपाटन : प्राची इस्वलकर (बाळासाहेबांची शिवसेना), डामरे : किरण कानडे (भाजप), ओसरगांव : सुप्रिया कदम(भाजपा), शिरवल : गौरी वंजारे (शिवसेना ठाकरे गट) या गावात 1 सदस्य ईश्वर चिठ्ठी ने निवडून देण्यात आला. नडगिवे : माधवी मन्यार (गाव पॅनल), कासार्डे: निशा नकाशे (भाजप), सांगवे: संजय सावंत (भाजप), कळसुली : सचिन पारधीये (भाजप), कलमठ : संदीप मेस्त्री (भाजप ), नाटळ : सुनिल घाडीगांवकर (भाजप), नांदगांव : रविराज उर्फ भाई मोरजकर, फोंडाघाट संजना आग्रे (बाळासाहेबांची शिवसेना , भाजपा युती), शेपे : स्मिता पांचाळ(भाजप), माईण: नितीशा पाडावे (भाजप) या 49 ग्रामपंचायतीचे सरपंच विजयी झाले आहेत तर, यापूर्वी बिनविरोध सरपंच निवडीत हुंबरट :मनिषा गुरव (भाजप), करुळ: समृध्दी नर (भाजप), साकेडी : सुरेश साटम (भाजप), वारगांव नम्रता शेटये (भाजप), भरणी अनिल बागवे (गाव पॅनल), शिडवणे रविंद्र शेटये (भाजप), पिसेकामते प्राजक्ता मुद्राळे (भाजप), वायंगणी अस्मी लाड(भाजप), ओझरम- समृध्दी राणे (भाजप) यांचा समवेश आहे.

You cannot copy content of this page