४७ ग्राम पंचायतसाठी होतेय मतदान
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात ४७ ग्रामपंचायती साठी उद्या दि. १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. तालुक्यात एकूण १३९ मतदान केंद्रांवर उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून यासाठी तहसील प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मालवण तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यातील असगणी, पळसंब, शिरवंडे, साळेल, आमडोस, कळसे, घुमडे व कातवड या आठ ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्य यांची निवडी बिनविरोध झाल्याने ४७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊन मतदान प्रक्रिया होत आहे. ४७ ग्रामपंचायती च्या निवडणुकीसाठी १३९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्या त्या केंद्रावर मतदान पेट्या व केंद्र अधिकारी रवाना झाले आहेत. यासाठी तहसील प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आठ महसूल विभागीय क्षेत्र अधिकारी, ३२ निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रत्येक केंद्रावर एक या प्रमाणे १३९ केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, गंगाराम कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
तसेच या निवडणुकी दरम्यान कायदा सुव्यस्था सुरळीत राहावी यासाठी मालवण पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून मतदान प्रक्रिये दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी १३९ मतदान केंद्रांसाठी १०६ पोलीस अंमलदार व ३३ होमगार्ड नेमून दिलेल्या केंद्रावर बंदोबस्त ठेवणार आहेत. आठ महसूल विभाग क्षेत्रावर प्रत्येकी एक पोलीस अधिकारी देखरेख ठेवणार आहेत. तर क्षेत्रीय गस्ती साठी ७ पोलीस अंमलदार, ७ होमगार्ड व ७ पोलीस अधिकारी काम पाहणार आहेत. तसेच पोलीस निरीक्षक विजय यादव हे देखील स्वतंत्ररित्या दोन अंमलदारांसह गस्तीद्वारे नियंत्रण ठेवणार आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
