माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी : प्रशासक जिरगे यांच्याकडून होतोय अक्षम्य दुर्लक्ष
⚡मालवण ता.१३-: मालवण नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री. संतोष जिरगे यांच्या प्रशासक पदाच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण होत असताना वर्षभरात आमच्या कालावधीतील विकास कामे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादी बाबतच्या कामकाजात प्रशासक जिरगे यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असून याबाबत वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. न.प. निवडणूका न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत. काम न झाल्यास लोक अजूनही आम्हालाच जबाबदार धरणार असल्याने संतोष जिरगे यांच्या प्रशासकीय कारभाराबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालवण शहरातील स्वच्छतेबाबत नियोजन दिसत नाही. मागील कित्येक वर्षे साठलेला आडारी डम्पिंग ग्राउंड येथील कचरा आमच्या कालावधीत उचलून डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्यात आले होते. त्याच डम्पिंग ग्राउंड ची आजची परिस्तिथी अतिशय खराब आहे. याच ठिकाणी सध्या ७० लाख रुपयांचे कचरा विलगिकरणाचे काम सुरू असताना ही परिस्थिती का उद्भवली ? असा सवाल महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला. कचरा संकलनात पैशांचा अपव्यय होत आहे. ठेकेदार कामगारांना पगार, प्रॉव्हिडंट फंड व इतर सुविधा देत नाही. ठेकेदारावर कारवाई होत नाही, स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप कांदळगावकर यांनी केला आहे.
पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने किनाऱ्यावर बायो टॉयलेटच्या पाच गाड्या घेऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी झाला तरी अद्याप गाड्या धूळ खात पडल्या आहेत. शहरात मैला सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन असून डास प्रतिबंधक फवारणी बंद आहे. मालवण शहरात पर्यटकांचा ओघ पाहता भरड येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५ लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही. शहरात दिशादर्शक फलक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहेत. फोवकांडा पिंपळ येथील रंगीत लाईट्स व कारंजा बंद अवस्थेत आहेत. शहरात आमच्या कालावधीत बसविण्यात आलेल्या हायमास्ट टॉवर पैकी आज ८० टक्के टॉवर बंद आहेत. अनेक ठिकाणच्या स्ट्रीटलाईट, डेकोरेटिव्ह लाईट बंद आहेत. शहरात सुमारे १ कोटी ८० लाख रुपये खर्चून होणारे सुसज्ज भाजी मार्केटचे काम गेले सहा महिने बंद असून मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुमारे होणाऱ्या मल्टीपर्पज हॉलचे कामही बंद आहे. अग्निशमन इमारत, न.प. आवार सुशोभीकरण ही कामे संथ गतीने सुरू आहेत. तसेच प्रस्तावित १५ कोटी निधीचे मत्स्यालय, भुयारी गटर योजना बाबत मागील ११ महिन्यात कुठलीही प्रगती झालेले नाही. कचऱ्यापासून खत निर्मिती मशीन बंद आहे. मासे मार्केट वरील गाळ्यांचा लिलाव झालेला नाही, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून फक्त पत्र, नोटिसा, दंड ही प्रशासकीय प्रक्रिया राबवली जात आहे. पण निधी उपलब्ध करुन देऊनही जर काम होत नसतील तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखं होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सगळ्याच विकास कामांना ब्रेक लागला आहे अशीच परिस्थिती मालवण शहरात आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करूनही मुख्याधिकारी यांच्या कडून ठोस अशी कार्यवाही केली जात नाही. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्ती कडे असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप कांदळगावकर यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या प्रशासकीय कारभाराची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कांदळगावकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
