बँ नाथ पै विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे

व्यापारी संघाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन

मालवण (प्रतिनिधी)

नुकताच सुरू झालेला सिंधुदुर्गचा चिपी येथील बॅ. नाथ पै विमानतळ बंद पाडण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे जाणवू लागले आहे. चिपी मुंबई ही नियमित सेवा कमी करण्यात आली आहे त्यामुळे याबाबत आवाज उठवून बॅ. नाथ पै चिपी विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू करण्यास शासनाला भाग पाडावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघा तर्फे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मालवण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जिल्हा व्यापारी महासंघातर्फ़े व्यापारी बांधवांनी भेट घेत विविध समस्या मांडल्या. याबाबतचे निवेदन ठाकरे यांना सादर करण्यात आले. यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, रवींद्र तळाशीलकर, नाना साईल, सरदार ताजर, उमेश शिरोडकर, गणेश प्रभुलकर, सौ. वैशाली तळाशीलकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील व प्रामुख्याने मालवण मधील व्यापारी बांधवांना विविध समस्या व अडचणी भेडसावत असून याबाबत सनदशीर मार्गाने प्रयत्न करूनही कोणतीही पूर्तता होत नसल्याने याबाबत आपल्या शैलीने वाचा फोडून व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या झाराप ते खारेपाटण पर्यंतच्या टप्प्याची पुनर्निर्मिती जवळपास ९७% पुर्ण झाल्याने २ डिसेंबर पासून पथकर वसुलीची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मात्र या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा नकाशा लक्षात घेतला तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यांतील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नसल्याने पथकराने अधिकचा भुर्दंड पडणार आहे. त्याच बरोबर कोल्हापूर नंतरची कणकवली बाजारपेठ हीच जिल्ह्याच्या घाऊक किराणा व्यापाराची मुख्य बाजारपेठ असल्याने उर्वरीत दक्षिण सिंधुदुर्गातील नागरिकांना या पथकरामुळे अधिकच्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. याच बरोबर जिल्ह्यातंर्गत उत्तर-दक्षिण रहदारी साठी अन्य पथकर मुक्त असा पर्यायी मार्गच उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेऊन ‘केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या भुमिपुजन समारंभात जिल्हावासीयांना जाहिररित्या दिलेला शब्द पाळण्यास भाग पाडून’ निदान सिंधुदुर्गातील रहिवाशांना नियोजित पथकरा पासून मुक्तता मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्गातील महावितरणची यंत्रणा ही सध्या केवळ रामभरोसे चाललेली आहे. व्यापारी महासंघाच्या आग्रहामुळे जिल्ह्याभरात नुकत्याच उपविभाग निहाय पार पडलेल्या दहाही वीज ग्राहकांच्या मेळाव्यात विज ग्राहकांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यां समक्ष वाचलेल्या तक्रारींच्या पाढ्यावरून प्रकर्षाने समोर आलेले आहे. सततच्या खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सर्वच व्यवसाय उद्योगांचे आणि खास करून पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच भविष्यातील पश्चिम किनारपट्टीवरील वादळांचे संभाव्य धोके लक्षात घेता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूयारी वीज वाहिन्यांचे जाळे निर्माण करणे ही आत्यंतिक गरज आहे. गेल्यावर्षी तौक्ते चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले त्यापेक्षा जास्त नुकसान हे दहा दिवस वीज खंडीत असल्यामुळे झाले त्यामुळे ही परिस्थती सुधारण्या साठी भुयारी वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे हा एक परिणामकारक उपाय आहे, यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, असेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला आज कधी नव्हे एवढी सक्षम व सुत्रबद्ध नियमावली लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. अश्या सुस्पष्ट नियमावलीच्या अभावा मुळे गळेकापू स्पर्धे पासून अपघाती मृत्यू पर्यंत अनेक पातळ्यांवर हा पर्यटन व्यवसाय धोक्यात येत आहे. आधीच कोरोना टाळेबंदीने मेटाकुटीस आलेला इथला स्थानिक पर्यटन व्यावसायीक या व्यवसायातून आणि भुमीतूनही कायमचा विस्थापित होण्याची दाट शक्यता आता पासूनच दिसू लागली आहे. वारंवार मागणी करूनही महाराष्ट्र शासन किंवा पर्यटन खाते यात काडीमात्रही लक्ष घालण्यास तयार नाही. याबाबत येथील पर्यटन व्यावसायीक व संबंधीत शासन यंत्रणा यांच्या मध्ये संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने आपण नियोजन करावे, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page