मालवण (प्रतिनिधी)
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ६१ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या सिंधुदुर्गे केंद्रावर नाट्य संस्थांचा व नाट्य रसिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, सध्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्र असे न राहता ते सिंधुदुर्ग केंद्र स्वतंत्र व्हायला पाहिजे यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही परीक्षक ईश्वर जगताप यांनी येथे बोलताना दिली
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या सिंधुदुर्गे केंद्रावरील प्राथमिक फेरीचा शानदार समारोप समारंभ नुकताच मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अ. भा. मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक विनायक कोळंबकर, स्पर्धेचे परीक्षक सतीश शेंडे, ईश्वर जगताप व मानसी राणे हे मान्यवर उपस्थित होते.
नाट्य स्पर्धा समारोपाचे प्रास्ताविक नाट्य स्पर्धेचे जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी केले. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना ग्रंथ भेट व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. तसेच ज्येष्ठ नाट्य रसिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना परीक्षक मानसी राणे यांनी, या जिल्ह्यातून नवीन नाटककार तयार झाले पाहिजेत असे सांगितले तर परीक्षक सतीश शेंडे यांनी मालवण शहरात आपण प्रथमच आलो व हे शहर आपल्याला खूप आवडले असे सांगितले
या वर्षी स्पर्धेमध्ये १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १५ नाटके सादर झाली. त्यामध्ये कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड व मालवणमधील संघांचा सहभाग होता. सर्वच नाट्य संस्थांनी नवीन विषय व दर्जेदार सादरीकरण केले. या १५ दिवसांमध्ये तब्बल ९ ते १० हजार रसिकांनी या नाटकांचा आस्वाद घेतला. तर १५ व १० रुपये अशी नाममात्र मूल्यांची तिकीटे असल्याने जवळजवळ ५५ हजार रुपयांची तिकीटविक्री झाली. या नाट्यस्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनी व प्रकाश योजनाकार शरद कांबळी, नाट्यगृह व्यवस्थापक सुभाष कुमठेकर, रिक्षा जाहिरात व तिकीट विक्री व्यवस्थापक सुधीर कद्रेकर, रंगमंच व्यवस्था सिद्धेश पालव, कार्यालयीन कामकाज श्रेया चव्हाण व प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण यांनी केले.
