ओझर ते मसुरे रस्त्याच्या दुरावस्थेवरून माजी सभापती उदय परब यांची बोचरी टीका;रस्ता डागडुजी साठी २६ फेब्रुवारीला उपोषणास बसण्याचाही इशारा
*💫मालवण दि.०६-:* सदैव आपल्या सोबत’ असे म्हणणारे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी मसुरे येथे आठ दिवस वास्तव्य करून ओझर- कांदळगाव- मसुरे बांदिवडे या खड्डेमय रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करावा म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील मतदार कोणत्या यातना भोगतायत याची जाणीव होईल अशी बोचरी टीका करीत मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी २६ फेब्रुवारी रोजी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, श्री परब यांच्या या उपोषणाला विविध स्तरातून पाठींबा मिळत असताना आज परब यांनी पुकारलेल्या उपोषणास बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या उपोषणास बांदिवडे ग्रामस्थ सहभागी होणार असल्या बाबतचे ग्रामपंचायतचे पत्र उपसरपंच किरण पवार यांनी परब यांच्याकडे सुपूर्द केले आहे. ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे ते आडवली रस्ता खड्डेमय झाला असून अनेक छोटे मोठे अपघात होऊन ग्रामस्थ जखमी होणे तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. सदर रस्ता कामाबाबत २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यास (रस्ता दुरुस्तीस प्रत्यक्ष प्रारंभ) २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती उदय परब यांनी दिला होता. आमदारांनी आठ दिवस मसुरे येथे वास्तव्य करावे आणि दुचाकी वाहनावरून कांदळगाव मार्गे प्रवास करावा म्हणजे येथील ग्रामस्थांच्या वेदना समजू शकतील. खराब रस्त्यामुळे दुचाकी वाहनावरून प्रवास करणाऱ्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास सुरू झाला आहे तसेच दुचाकी वाहने खिळखिळी झाली आहेत. भविष्यात कितीतरी जणांना त्रास होणार असून ‘सदैव आपल्या सोबत’ म्हणणारे आमदार ग्रामस्थांच्या ह्या दुखण्याची जबाबदारी घेणार का ? असा सवाल सुद्धा उदय परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. उदय परब यांच्यासह कांदळगाव ग्रामस्थांच्या आंदोलनास आता बांदिवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचीही साथ मिळणार आहे.
