आता प्रशासनाला सहकार्य नाही; अवैध मासेमारीविरोधात पारंपारिक मच्छीमार छेडणार जनआंदोलन

मत्स्य विभागाच्या कारभाराविरोधात पारंपारिक मच्छीमार आक्रमक

⚡मालवण ता.३०-: जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी, पर्ससीन नेटद्वारे अवैधरित्या मासेमारी होत असताना मत्स्यव्यवसाय खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसून सागरसुरक्षा रक्षकांची त्यांना साथ असल्याचा आरोप करत आक्रमक बनलेल्या पारंपारिक मच्छीमारांनी आज सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्व सागर सुरक्षारक्षकांना तत्काळ निलंबित करण्यात यावे तसेच गस्तीनौकाही कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशा मागण्या यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी करत यापुढे पारंपरिक मच्छिमार ना मत्स्यव्यवसाय खात्याला ना पोलिसांना सहकार्य करणार, आमची तयारी झाली आहे, आता आमच्या पद्धतीनेच उपाययोजना करताना प्रखर जनआंदोलन उभारू, असा आक्रमक इशारा यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी दिला.

आचरा येथील समुद्रात बेपत्ता झालेली नौका, सागर सुरक्षा एलईडी, पर्ससीन धारकांना करत असलेले सहकार्य, मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचा गलथान कारभार यांसह अन्य समस्यांबाबत आज पारंपरिक मच्छिमारांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक दिली. यावेळी मच्छीमारांनी प्रभारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, अरविंद मोंडकर, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, सन्मेष परब, प्रशांत तोडणकर, तेजस्विनी ढोलम, हेमंत जोशी, जगदीश खराडे यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत पर्ससीन धारकांची, एलईडी धारकांची घुसखोरी सुरू असतानाही मत्स्यव्यवसाय विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नेमलेले सागर सुरक्षा रक्षकांचीच त्यांना साथ आहे. हेच सर्व सुरक्षा रक्षक मॅनेज करत असून त्यांना मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे या सर्व सुरक्षा रक्षकांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. गस्तीनौकेवर जे अधिकारी गस्त घालण्यास जातात त्याचे सीसीटीव्ही फुटेज तसेच कॉल डिटेल्स आम्हाला द्या. शासनाची गस्तीनौका ही एक देखावा असून त्यावरील अधिकारी भ्रष्ट आहेत असा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला.

गेली काही वर्षे पारंपरिक मच्छिमारांचा अवैध मासेमारी विरोधात लढा सुरू आहे. यात थोड्या फार प्रमाणात कारवाई झाली. मात्र प्रत्येक मासेमारी हंगामात घुसखोरी सुरूच आहे. पर्ससीन नौकेवर बुम लावून मासेमारी केली जात आहे याची तपासणी होणे गरजेचे असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पारंपारिक मच्छिमार आमचे डोळे आहेत असे प्रत्येकवेळी सुरक्षा यंत्रणा सांगते. मात्र हे डोळेच फोडून हा समुद्र पर्ससीन, एलईडी धारकांना आंदण म्हणून देण्याचे काम मत्स्यव्यवसायचे भ्रष्ट अधिकारी करत आहेत. त्यामुळे आम्ही पारंपरिक मच्छिमार यापुढे मत्स्यव्यवसाय खात्याला, पोलिसांना कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका यावेळी पारंपारिक मच्छीमारांनी मांडली.

काही महिन्यांपूर्वी आचरा बंदरात मत्स्यव्यवसायच्या परवाना अधिकाऱ्यांना मारहाण झाली. मात्र संबंधित अधिकारी आपल्याला मारहाण झालीच नाही असे सांगतो हे योग्य नाही. ते पैसे खात असल्यानेच अवैधरित्या मासेमारी करणाऱ्यांकडून मार खात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी मच्छीमारांनी केला. शासनाच्या गस्तीनौकेवर मत्स्य हंगामात सुमारे ३३ लाख ६० हजार रुपयांचा खर्च होत आहे. मग या गस्तीनौकेच्या माध्यमातून अवैधरित्या मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करत किती महसूल गोळा करण्यात आला याची माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपरिक मच्छिमारांना मत्स्यव्यवसाय विभागाचे कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने यापुढे हे कार्यालयच नको अशी आमची मागणी राहणार आहे. आतापर्यंत आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केली. मात्र आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. आमची तयारी झाली आहे. अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी आता आम्ही प्रखर जनआंदोलन छेडण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा इशारा यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी दिला.

यावेळी मत्स्यदुष्काळ जाहीर करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करण्याबरोबरच अन्य मागण्यांचे निवेदन सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सादर करण्यात आले. पारंपरिक मच्छीमारांच्या भावना लक्षात घेत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे प्रभारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. राजम यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page