चेअरमन संतोष परब : मडुरा सोसायटीच्या शौचालयाचे उद्घाटन
⚡बांदा ता.३०-: सोसायटीच्या सर्व सभासद, संचालक व सहकाऱ्यांची गेली अनेक वर्षे होणारी गैरसोय लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने आज एक चांगले शौचालय उभारण्यात आले. संस्थेच्या वाटचालीत सर्वांचेच भरीव योगदान मिळाल्याने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकलो, असे प्रतिपादन मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी केले.
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या शौचालयाचे उद्घाटन चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघ संचालक आत्माराम गावडे यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन जगन्नाथ परब, संचालक अशोक कुबल, उल्हास परब, प्रकाश सातार्डेकर, संचालिका सुनंदा परब, सचिव सुभाष राऊळ, मडुरा तलाठी विजय कविटकर, कर्मचारी प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
संतोष परब म्हणाले की, सहकार क्षेत्रात काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परंतु कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शेतकऱ्यांना अभिप्रेत असे काम केल्यामुळे समाधान वाटते. संचालक अशोक कुबल म्हणाले की, शेती व बागायतीसाठी लागणारे खतांचा पुरवठा वेळेत करा. कारण वेळेत खत न मिळाल्यास शेतकऱ्यांना अधिकची पदरमोड करून बांदा या ठिकाणी जावे लागते. त्यावर आत्माराम गावडे यांनी खत पुरवठा वेळेवर होणार असल्याचा विश्वास दाखविला. प्रकाश सातार्डेकर, सुनंदा परब यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. तर सचिव सुभाष राऊळ यांनी सर्वांचे आभार मानले.
