युवासेनेचे प्रवीण परब यांचा भाजपात प्रवेश

मडुऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेला धक्का बसण्याची शक्यता

⚡बांदा ता.३०-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर सातार्डा युवासेना उपविभाग प्रमुख प्रवीण उर्फ पिंट्या परब यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून गावाच्या विकासासाठी आपल्या सहकाऱ्यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दि. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचा फायदा भाजपला होणार असल्याने शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी येथे सदर प्रवेश झाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक महेश सारंग, सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव, तसेच गुरुनाथ पेडणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, पिंट्या परब म्हणाले की मडुरा गावात शिवसेनेच्या माध्यमातून मोठा निधी आला नाही. गाव पातळीवरील समस्या पदाधिकाऱ्यांना सांगूनही सोडवल्या जात नाही. एकंदरीत पदाधिकाऱ्यांच्याच मनमानीला कंटाळून आपण भाजपात प्रवेश केल्याचे श्री. परब यांनी सांगितले. तसेच मडुरा गावचे सुपुत्र संजू परब व यशवंत माधव यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी भरीव योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page