आ राणे धमकी देणे, दडपशाहीत टॉप टेनमध्ये

ठाकरे सेनेच्या अतुल रावराणे यांचा आरोप

देवगड-प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू व अन्य नगरसेवकांना भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे हे लाखो रुपयांची ऑफर देत असून व महिला नगराध्यक्षांना फोन करुन भाजपामध्ये प्रवेश न केल्यास धमकीदेखील देत आहेत. अशी दडपणशाही आमदार राणे करीत आहेत. यामुळे नुकत्याच प्रदेशाध्यक्षा बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे हे टॉप दहा मधील आमदार असे जाहीर केले होते. हे खरे असून आमदार नितेश राणे धमकी आणि दडपण देण्यामध्येच टॉप टेनमध्ये आहेत. असा घणाघाती आरोप अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
देवगड शिवसेना कार्यालयामध्ये अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, तालुकाध्यक्ष् मिलिंद साटम आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रावराणे म्हणाले की, एका महिला नगराध्यक्षाला भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी धमकी दिली हि महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतिनिधीमधील अनादर करणारी बाब आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आली. हि सत्ता आल्यापासून आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचे नगरसेवक फोडाफोडीचे डोहाळे लागले आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये सत्ता असताना केलेल्या भ्रष्टाचारामुळेच येथील जनतेने नाकारले आहे. भाजपाची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती हि अजूनही आमदार नितेश राणे यांनी आत्मसाद केलेली नाही. हे शिकविण्याचे काम माजी आमदार अजित गोगटे यांनी करावे त्यांच्यावरती सुध्दा केलेली अंडीफेक हे गोगटे विसरले असतील पण आपण अदयापही विसरलेलो नाहीत. धमक्या देवून नगरसेवक फोडण्याचे काम महाराष्ट्रामध्ये कधीही झालेले नाही मात्र असे घाणेरडे राजकारण हे आमदार नितेश राणे करीत आहेत. त्यांना त्यांची जागा येथील जनताच दाखवेल देवगड जामसंडे नगरपंचायतीची जनता हि सुज्ञ जनता आहे. म्हणून त्यांनी या जनतेचे भ्रष्टाचारी भाजपा पक्षाला बाजूला ठेवून शिवसेना पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली आहे. अल्पावधीतच देवगड जामसंडे नगरपंचायतीची झालेली विकास कामे व वाढत असलेला उध्दव बाळासाहेब गटाचा पक्ष हिच बाब आमदार राणे यांना वाईट वाटत आहे.म्हणूनच घाणेरडे राजकारण करुन लाखो रुपयांची नगरसेवकांना ऑफर देवून पक्ष फोडण्यासाठी आमदार राणे प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही कारण उध्दव ठाकरे गटाचा शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक आहे तो कधीही स्वार्थासाठी दुस-या पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. अशी माहिती पत्रकार परिषदेव्दारे अतुल रावराणे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page