समाज साहित्य प्रतिष्ठानचा समाज साहित्य कथा पुरस्कार विवेक कडू यांना जाहीर

भूमी काव्य पुरस्कार कवी प्रा.एकनाथ पाटील यांना जाहीर

⚡कणकवली ता.२९-:
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कारासाठी शब्द पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या प्रा. विवेक कडू (पालघर) यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कारासाठी लोकवांड:मय गृहने प्रसिद्ध केलेल्या कवी प्रा.एकनाथ पाटील (इस्लामपूर) यांच्या ‘आरपार झुंजार’ या दीर्घ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी दिली.
दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार योजनेचे परीक्षक ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक नितीन रिंढे, रणधीर शिंदे, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी सदर संग्रहांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. जानेवारी मध्ये सावंतवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.प्रा. विवेक कडू हे आजचे
मराठीतील महत्त्वाचे कथाकार
असून प्रा.कडू यांच्या सर्वच कथेत
पाण्याचा संदर्भ आहे.खोलवर
विरघळून गेलेल्या माणसांचे अंत:स्तर शोधून व्यापक जीवनानुभव आविष्कृत केला आहे. गोष्ट सांगण्याची ओघवती शैली, आठवणी, स्वप्ने, पात्रांच्या सूक्ष्म हालचाली, त्या हालचालीतून उभी राहिलेल्या जीवंत व्यक्तिरेखा, व्यामिश्र आणि संपन्न अनुभवाची सरमिसळ, बोलीभाषेतील संवाद या सर्व पातळ्यावर विवेक कडू यांची कथा यशस्वी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कथा वाचताना एक दृश्यमालिका डोळ्यासमोर उभी राहते.तर तत्वांची बांधिलकी आणि नैतिकता या गुणांच्या बळावर प्रा.एन.डी.पाटील यांनी परिघाबाहेरच्या उपेक्षित, वंचित माणसांच्या हक्कांचे अनेक लढे प्राणपणाने लढविले. परिणामांची तमा न बाळगता नाही रे वर्गांच्या बाजूने ते ठामपणाने उभा राहिले. त्यांचा हा तत्वप्रधान संघर्ष कवी एकनाथ पाटील यांनी ‘आरपार झुंजार’ या दीर्घकवितासंग्रहात नेमकेपणाने पकडला आहे. सामाजिक चळवळी क्षीण होत निघाल्याच्या आजच्या मूल्यऱ्हासाच्या काळात विचारांची बांधिलकी सांगणारी ही कविता खूप महत्त्वाची आहे.त्यामुळेच या दोन्ही ग्रंथांची समाज साहित्य कथा आणि भूमी काव्यपुरस्करासाठी निवड करण्यात आली असल्याचा अभिप्राय परीक्षकांनी नोंदवला आहे.

You cannot copy content of this page