⚡सावंतवाडी ता.२८-: साहित्यिक असो अथवा कवी असो जो समाजभान राखतो तोच समाजाभिमुख ठरतो. साहित्यात रंजकतेपेक्षा वास्तवकतेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. जो कवी वास्तववादी समाजाचे चित्रण रेखाटतो तोच समाजाचा आदर्श असतो असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार तथा लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.
समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्यावतीने संविधान दिनानिमित्त रविवारी सायंकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान येथे संविधान अभिवादन कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या आंबेडकर चौकातील कविता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून श्री बांदेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर, उपाध्यक्ष भावना कदम, सचिव मोहन जाधव, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पत्रकार संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, कवी विठ्ठल कदम, निमंत्रित कवी व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात अनंत कदम व ममता जाधव यांच्या भिमगीताने करण्यात आली. प्रा. बांदेकर यांनी कवी संमेलनात एका पाठोपाठ एक अशा एकसोएक सादर केलेल्या बहारदार कवितांचा आढावा घेऊन ज्या पावनभूमीत आपण हा कार्यक्रम सादर केला त्याच स्थळात असे परिवर्तनशील कार्यक्रम आतत्याने होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी सचिव मोहन जाधव यांनी स्वागत करून प्रेरणाभुमीचे उपक्रमांची माहिती दिली. तर संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी प्रेरणा भूमीची प्रेरणा सांगून कार्यक्रम घेणे हा आमचा उद्देश नसून उद्देश ठेऊन कार्यक्रम घेणे हा आमचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. प्रेरणाभूमी ही भक्तीची नव्हे तर शक्तीची प्रेरणा स्थळ निर्माण होणे हा आमचा उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ कवी अरुण नाईक यांनी सादर केलेल्या दीर्घ कवितेने श्रोत्यांची वाहवा घेतली. तर स्थानिक कवी मनोहर परब यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर सादर केलेल्या मालवणी कवितेने श्रोत्यांची मने जिंकली. तसेच पांडुरंग कौलापुरे यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे उत्सुर्त कविता सादर केली. याशिवाय प्रकाश तेंडोलकर, दीपक पटेकर, दीपक तळवडेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे, ऋतुजा सावंत भोसले, स्वेतल परब, दिलीप चव्हाण, रुपेश पाटील, मधुकर मातोंडकर, चंद्रशेखर जाधव, स्नेहा कदम, विठ्ठल कदम इ. कवींनी समाजभान ठेवणाऱ्या परिवर्तनवादी एकसोएक बहारदार कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांनी आपल्या ओघवत्या व ठुमासदार शैलीत विविध कवितांचे दाखले देत केले. शेवटी प्रवीण बांदेकर यांच्या कवितेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला व त्यांनतर अनंत कदम यांनी आभार मानले.
फोटोवळ – कार्यक्रमात सहभागी झालेल्या कविंसह श्रोते व मान्यवर
