कामगार संपामध्ये मालवणातील कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सहभाग…

काम बंद ठेवत दिला संपाला पाठिंबा..

⚡मालवण ता.१२-:
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी कामगारांच्या संपामध्ये मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी सहभागी होऊन काम बंद ठेवत या संपाला पाठिंबा दर्शवीला. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण व नगरसेवकांनी कामगारांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर कामगारांनी पुन्हा काम सुरु केले.

कामगारांनी लढून मिळविलेले २९ कायदे केंद्र सरकारने रद्द करून ४ श्रम संहिता केल्यामुळे ऑल इंडिया सेंट्रल कौन्सील ऑफ ट्रेड युनियन्स संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघातर्फे आज देश भरातील कामगारांचा संप पुकारण्यात आला होता. या संपाला मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी काम बंद ठेवून पाठिंबा दिला. यावेळी मालवण नगरपालिकेसमोर स्वच्छता कामगारांनी ठिय्या मांडला. या स्वच्छता कंत्राटी कामगारांना यापूर्वी थकीत वेतनामुळे अन्यायाला सामोरे जावे लागले होते, तसेच भविष्य निर्वाह निधी देखील कामगारांच्या पीएफ खात्यावर जमा झालेला नसल्याने याबाबत कामगारांनी मालवण नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करण्याची मागणी केली होती, तसेच सदर कंपनीने निधी जमा केला असल्यास त्याची माहिती द्यावी, असेही कामगारांनी म्हटले होते. याच मागण्यांचा विचार आजच्या संपाच्या निमित्ताने प्रशासनाने करून कामगारांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी भूमिका यावेळी कामगारांनी मांडली.

या काम बंद आंदोलनात विजय काळसेकर, ओंकार नाईक, रितेश परब, सुभाष जाधव, जगन्नाथ केळूसकर, अर्जुन कदम, समीर कासले, सदाशिव मालवणकर, संतोष कोळंबकर, नवनाथ परब, स्नेहा कदम, हेमंत वायंगणकर, नरेश वायंगणकर, किरण नांदोसकर, चंद्रकांत वराडकर, प्रवीण जाधव, धीरज आचरेकर, सागर आचरेकर, प्रमोद कदम, प्रफुल्ल वायंगणकर, गणेश लुडबे, अर्जुन काळसेकर आदी कामगार सहभागी झाले होते.

यावेळी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण व यांच्यासह नगरसेवकांनी कामगारांची भेट घेऊन चर्चा करून कामगारांवर अन्याय होणार नाही, मागण्यांच्या पूर्ततेबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी काम बंदची भूमिका मागे घेत पुन्हा कामास सुरुवात केली. यावेळी महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, मेघा सावंत, अनिता गिरकर , नगरसेवक सिद्धार्थ जाधव आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page