ग्रामपंचायत निवडणूक मनसे लढविणार

गाव पॅनलला पाठिंबा: पक्षीय निवडणुकीत मनसे उमेदवार असणार
राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर

मालवण (प्रतिनिधी)

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उमेदवार मालवण तालुक्यात ग्रा.प. निवडणूक लढविणार असून काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध उमेदवार ठरले आहेत. ज्या गावात गाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल तिथे मनसे गाव पॅनलला पाठिंबा देणार असून जिथे पक्षीय लढत असेल तिथे मनसे पक्ष म्हणूनच आपले उमेदवार उभे करून लढणार आहे, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मालवण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मालवण येथील हॉटेल विशाल मध्ये परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, उपतालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर व उदय गावडे, शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, महिला शहराध्यक्ष भारती वाघ, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड व प्राजक्ता पार्टे, शहराध्यक्ष वैभव माणगावकर, साक्षी पार्टे, वैभव आजगांवकर, मिलिंद तेली, दर्शन सावजी, प्रतिक कुबल आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने व मतदारांनी उमेदवार निवडून देताना यापूर्वी सत्ता असलेल्या लोकप्रतिनिधींनी गावातील विकास, रस्ते कितपत पूर्ण केले हे पाहावे, ते पूर्ण नसेल तर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विकास न करता केवळ घोषणा केल्या. घोषणा करूनही कामे पूर्ण झाली नाहीत, झालेली कामेही नित्कृष्ट दर्जाची झाली, त्यामुळे मते मागायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेने याचा जाब विचारणे गरजेचे आहे, असेही उपरकर म्हणाले.

सर्व पक्ष एकमेकांवर टीका करून जनतेचे विकासापासून लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत, लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी पक्ष बदलतात हे जनतेने पाहावे आणि त्यानंतरच योग्य उमेदवार निवडून द्यावा. ग्रामपंचायतीना राज्य व केंद्र सरकार कडून निधी हा येतच असतो, कोणाची सत्ता आली म्हणून निधी येतो असे नसते हे जनतेने लक्षात घ्यावे, आलेला निधी योग्य कमी खर्च करण्यात सरपंच तत्पर असले पाहिजेत, एखादे विकास काम होण्यासाठी पाठपुरावा करून निधी खर्च करणे महत्वाचे असते, असेही उपरकर यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page