सुषमा अंधारे यांनी घेतला नौकाविहाराचा आनंद

मालवण चिवला बीचच्या समुद्रात स्वतः चालविली बोट; डॉल्फिनचेही झाले दर्शन

⚡मालवण ता.२३-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मालवण चिवला बीचच्या समुद्रात स्वतः बोट चालवीत नौकाविहाराचा आनंद लुटला. उपनेत्या अंधारे या नौकाविहार करत असतानाच त्यांना डॉल्फिनचेही दर्शन झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.

गेले दोन दिवस शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांचे दोन सुपुत्र तसेच शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका केल्याने त्या सध्या चर्चेत आहेत. काल मंगळवारी सायंकाळी आपल्या कुटुंबासह मालवणात दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांनी आज मालवण चिवला बीचला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेत्या संजना घाडी याही उपस्थित होत्या. यावेळी पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांच्याकडून बोट चालविण्याची माहिती जाणून घेत स्वतः बोट चालवीत नौका विहाराचा आनंद लुटला.

यावेळी शिवसेना उपनेत्या अंधारे यांना चिवला बीच वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांनी मालवण धुरीवाडा कुरण भागात तसेच कवडा रॉक याठिकाणी जेटी नसल्याने वॉटर स्पोर्टच्यावेळी असंख्य अडचणी येतात त्यामुळे मालवण धुरीवाडा कुरण भागात तसेच कवडा रॉक याठिकाणी जेटी होणे गरजेचे आहे जेटी झाल्यास पर्यटकांना नौका विहार तसेच वॉटर स्पोर्टस आणि डॉल्फिन दर्शनाचा सुलभरीत्या आनंद लुटता येईल म्हणून शासनस्तरावर याबाबत प्रयत्न करावेत असे उपस्थित वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांनी सांगितले. यावेळी वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांच्या वतीने मनोज मेतर, रोहित मेतर, सोन्या फर्नांडिस, सचिन गोवेकर, विशाल गोवेकर, सागर धुरी, कृष्णा सावंत, जॉन्सन रॉड्रिक्स तसेच भाई कासवकर, बाबी जोगी आदी उपस्थित होते. सकाळी ७:३० वाजता नौका विहारासाठी नौकेत बसलेल्या सुषमा अंधारे यांनी तब्बल दोन तास समुद्र सफरीचा आनंद लुटला.

दरम्यान, बाबी जोगी यांच्या निवासस्थानी मालवणी पाहुणचार व मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला. यावेळी पारंपारिक मच्छिमार यांच्या विविध समस्या जाणून घेत, पर्ससीन एलईडी लाईट मासेमारी लढ्याविषयीही माहिती बाबीजोगी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून जाणून घेतली.

मालवणची निसर्ग सौंदर्यता मालवणी पाहुणचार मालवणी खाद्यसंस्कृती आदींचे सुषमा अंधारे यांनी विशेष कौतुक केले.

You cannot copy content of this page