जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे 100 कोटी थकीत;

मनसे पुन्हा तक्रार करणार;मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.०८-: जिल्ह्यात एका कंपनीकडून होत आसलेल्या फसवणुकीबाबत मनसेच्यावतीने आम्ही या कंपनीची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि एसपींना केली होती. या कंपनीने जनतेला प्रलोभन दाखवून जनतेचे पैसे लुटले. आज जिल्ह्यातील लोकांचे जवळपास 100 कोटी रुपये थकीत आहेत. दुकानांची भाडी दिली गेली नाहीत. या कंपनीच्या एजंटांनी लाखो रुपये कमावले आहेत. त्या एजंटांबाबत तसेच देश व महाराष्ट्र आणि गोवा राज्याची जबाबदारी असलेल्या दोघां विरोधात आम्ही पुन्हा एसपींकडे तक्रार देणार आहोत, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सांगितले.फसवणुकीविरोधात मनसे आवाज उठवत आहे. त्याला नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी साथ द्यावी, असे आवाहन यावेळी परशुराम उपरकर यांनी केले.

कणकवली येथे मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते.

या कंपनीकडून गेल्या एप्रिल महिन्यापासून लोकांचे पैसे येणे बंद झाले. त्यानंतर आमच्याकडे या विरोधात अनेक तक्रारी आल्या. मनसेच्या माध्यमातून याबाबत एसपींकडे तक्रार केल्यानंतर या नोव्हेंबरपर्यंत सर्व लोकांचे पैसे मिळतील असे इंडिया हेड आणि गोवा – महाराष्ट्रचे प्रमुख यांनी सांगितले. कंपनीचे अधिकारी हे परदेशात जाऊन तिथल्या कंपनीशी बोलणी करत आहेत. तेथून पैसे आले की सर्वांचे पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर मनसेच्या माध्यमातून तक्रार नोंद झाली तर पैसे अडकतील असे सांगून दिशाभूल केली आहे.
ही मुळात मेडिकल आयुर्वेदिक कंपनी असून त्यांनी त्यामधून धान्य विक्री, गृहोपयोगी वस्तूंची 33% डिस्काउंटवर विक्री करणे सुरू केले. त्यातून प्रलोभने दाखवून त्यांनी खूप पैसा कमावला. अशाच प्रकारच्या अनेक कंपन्या धान्य वितरण करणारी दुकानं घालून त्या दुकानात 1200 रुपये दिल्यानंतर 1000 रुपयांचा माल देतात आणि 200 रुपये प्रलंबित ठेऊन पुढच्या महिन्यात परत 200 रुपये टाकून 500 रुपयांचा माल फुकट घेऊन जायचा असे सांगत आहेत. तसेच दहा लाख दिल्यानंतर महिन्याला 40 हजार रुपये देणार असे म्हणत फसवणूक करत आहेत. या प्रलोभनाला बोलून जिल्ह्यातील लोकांचे साधारण तीन हजारांपासून पस्तीस लाखांपर्यंत असे साधारण शंभर कोटी रुपये गुंतले आहेत. त्यासाठी आता लोकांनी एकत्र येऊन अशा कंपनी विरोधात पुढे येण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांकडे असलेल्या कोडच्या माध्यमातून सारी माहिती एकत्र करून एसपींकडे देण्यात येईल. कंपनीचे प्रमुख तसेच इतर एजंटांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनवर या विरोधात तक्रार देण्यात यावी. या कंपनीचे प्रमुख दोन ते अडीच हजार कोटी रुपये घेऊन परदेशात गेले आहेत. या विरोधात मनसे आवाज उठवत आहे. त्याला नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी साथ द्यावी, असे आवाहन यावेळी परशुराम उपरकर यांनी केले.

You cannot copy content of this page