ऑनलाइन तक्रार नोंदवून देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मनस्ताप
⚡कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यात नागवे, करंजे, हरकुळ, साकेडी आदी अनेक भागांमध्ये गव्या रेड्यांकडून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. काही भागांमध्ये गव्या रेड्यांकडून भात शेतीचे पूर्ण क्षेत्र फस्त करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
साकेडीसह काही भागामध्ये गव्या रेड्यांकडून भात शेती च्या वाफ्यांमध्ये भात पिकाची नासाडी देखील केली आहे. साकेडी, नागवे, करंजे, हरकुळ बु. आदि भागांमध्ये सुमारे पाच ते सहा गव्यांचा कळप गेले काही दिवस सातत्याने फिरत असून, या गव्या कडून झालेल्या नुकसानी बाबत वनविभागाकडून तात्काळ कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी असे नुकसान झालेले निदर्शनास आल्यानंतर ऑनलाइन तक्रार नोंदवावी असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार करणे हे शक्य होणार का? जर अशी तक्रार वनविभागाकडे शेतकऱ्यांनी केली तर याकरिता वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःहून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्याची ऑनलाईन तक्रार नोंदवून घेणे किंवा वन विभागाच्या कार्यालयातून तक्रार ऑनलाईन करणे गरजेचे आहे. ऑनलाइन तक्रार करून देखील विहित कालावधीत पंचनामे होत नसतील तर त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. या बाबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेत शासन आदेशाप्रमाणे त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. एकीकडे रानगवे किंवा सांबर आदींच्या उपद्रवांमुळे शेतकरी हैरान झालेले असतानाच वनविभाग, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पंचनाम्या करिता दिवाळीची सुट्टी हा देखील अडसर ठरत आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी काही अधिकारी, कर्मचारी हे सुट्टीवर गेल्याने हे पंचनामे करण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
