समाज साहित्य प्रतिष्ठानचे समाज साहित्य संमेलन १२ रोजी सावंतवाडीत

प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाहक वैभव साटम यांची माहिती

⚡कणकवली ता.३१-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे 12 नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे समाज साहित्य संमेलन 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठ दिवसात संमेलन अध्यक्षांची तसेच संमेलन प्रमुख पाहुण्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी दिली आहे.
समाज साहित्य ही चळवळ गेली काही वर्ष तळकोकणात क्रियाशीलपणे कार्यरत आहे. कोकणातील साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देणे त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुणवंत साहित्यिकांचे लेखन उत्तम वाचकांसमोर आणण्यासाठी गुणवत्ता असणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींना पुरस्कार देणे असा उद्देश ठेवून काम करत आहे.या पार्श्वभूमीवर विख्यात इतिहासतज्ञ सिंधुदुर्ग भूमिपुत्र, घटनातज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर इतरही पुरस्कार देऊन उत्तम साहित्य कलाकृती सर्व दूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.प्रतिष्ठानच्या सदर कामाला महाराष्ट्रातील जाणकार साहित्य रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी समाज साहित्य संमेलन 2022चे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवान कवींची साहित्य निर्मिती एकत्रित प्रसिद्ध व्हावी म्हणून गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आले. यात “सिंधुदुर्गातील आजची कविता” हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्याचबरोबर अजून एक कवितेचा ग्रंथ या संमेलनात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे.
समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते.त्यामुळे समाजाला जोडूनच साहित्य चळवळीचे काम चाललं पाहिजे अशी भूमिका प्रतिष्ठानची आहे. “कला ना कलेसाठी कला विवेकासाठी” असं ब्रीदवाक्य प्रतिष्ठानचे असून विवेक हरवलेल्या समाजासाठी साहित्याची निर्मिती केली जायला हवी.असा यामागे विचार आहे. त्यामुळे विवेकी काम करणाऱ्या समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना-साहित्यिकांना जोडून हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संमेलन 2022 च्या अध्यक्षपदी सामाजिक काम करणाऱ्या लेखकाची निवड करण्यात येणार आहे. तरी या संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री मातोंडकर आणि प्रा.साटम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page