जिल्हा बालकल्याण समितीची पोलिसांच्या मदतीने कारवाई..
⚡वैभववाडी ता.२९-: घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघालेल्या वास्को गोवा येथील अल्पवयीन मुलाला वैभववाडी पोलिसांच्या मदतीने त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा बाल कल्याण समिती मार्फत ही कार्यवाही करण्यात आली.
वास्को गोवा येथील अल्पवयीन मुलगा घरात कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला. थिविम गोवा येथून तो मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढला. रेल्वे राजापूर स्थानकात आली असता तेथून परत तो गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला. या रेल्वेतून तो वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरला. तेथून त्याने सहा आसनी रिक्षातून वैभववाडी बस स्थानक गाठले.
शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तो वैभववाडी बस स्थानक परिसरात फेऱ्या मारीत होता. यावेळी काही प्रवाशांनी याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल मारुती सोनटक्के यांना दिली. त्यानंतर त्याला वैभववाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपण घरातून कोणालाही न सांगता आलो व राजापूर येथे बहिणीकडे जात होतो अशी माहिती दिली. यावेळी उपस्थित महिला पोलीस हवालदार माधुरी अडुळकर यांनी या अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी संपर्क साधून मुलाची माहिती दिली. त्यानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून या अल्पवयीन मुलास ओरोस येथे जिल्हा बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. तेथे त्याच्या वडिलांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यापूर्वीही हा मुलगा अशाच प्रकारे घरातून निघाला होता. त्यावेळीही तो वैभववाडी पोलिसांना सापडला होता.
