आचरा भागातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

⚡मालवण ता.१५-: आचरा परीसरातील शेकडो महिलांनी महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये आचरा, हडी, वायंगणी, रेवंडी आदी भागातील महिलांचा समावेश आहे. यावेळी महिलांनी स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या.

आचरा येथील महेश राणे यांच्या हॉटेल राणेशाही येथे किरण सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित बचत गटाच्या महिलांनी आपापल्या गावातील सामाजिक, तसेच वैयक्तिक समस्या किरण सामंत यांच्यासमोर मांडल्या. किरण सामंत यांनी समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले. यानंतर उपस्थित महिलांनी महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संदेश सावंत, महेश राणे, बबन शिंदे,विलास साळसकर,उल्हास तांडेल, विश्वास गांवकर, अश्विन हळदणकर, महेंद्र घाडी, दिपक राऊत, बाळू केरकर, संतोष केरकर आदी उपस्थित होते.

किरण सामंत यांनी आचरा रामेश्वर दर्शनानंतर देवस्थान कार्यालयास भेट दिली. यावेळी अभय भोसले जगदिश पांगे, देवस्थान कारकून बाबा देसाई यांनी आचरा इनाम देवस्थानमुळे शासकीय योजना राबविण्यात अडचण येत असल्याची बाब सामंत यांच्या समोर स्पष्ट करुन श्री देव रामेश्वराचे हक्क अबाधित ठेवून गावच्या विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. त्यानंतर राजन पांगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आचरेगावातील अनेक ग्रामस्थांनी, न्यू इंग्लिश हायस्कूल स्थानिक समिती मुख्याध्यापक यांनी सामंत यांना निवेदन दिले.

You cannot copy content of this page