दशावतार क्षेत्रात उल्लेखनीय कथालेखनाबाबत पुणे येथील आर्ट बिटस् फाउंडेशन महाराष्ट्रच्यावतीने सन्मान
⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मळेवाड येथील अजित गाडगीळ यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्रचा ‘कला सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दशावतार क्षेत्रात उल्लेखनीय नाट्य कथालेखनाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोककला ” या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे कडून प्रौढ कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे लोक कलावंत अजित गाडगीळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. मळेवाड येथील अजित गाडगीळ हे सातत्याने वेगवेगळया विषयावर आधारित नाट्य कथा लेखन करत आहेत.
या पुरस्कार विषयी माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार दरवर्षी आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात येते. आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्वच विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
