*सेनेच्या गोटात चर्चा तर;रोणापाल सरपंचाच्याही सेना पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी वाढल्याने चर्चेला उधाण
*💫बांदा दि.०१-:* आमदार दीपक केसरकर व शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासोबत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या दिवसेंदिवस गाठीभेटी वाढत आहेत. पूर्वीचे राणे समर्थक अन् सद्यस्थितीत कुठच्याही पक्षात नसलेले रोणापाल सरपंच सुरेश गावडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. तर मडुरा माऊली मंदिरात शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच बैठकीत आमदारकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या अन् दीपक केसरकर यांनी टाळ्या वाजविल्याने पुढील राजकारणाचा रंग वेगळा असणार अशी चर्चा आहे. मडुरा माऊली मंदिरात माऊली रस्ता संघर्ष समितीच्या बैठकीत सदस्य जगन्नाथ पंडित म्हणाले की, 30 वर्षापूर्वी दीपक केसरकर हे आपल्यासोबत एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बसले होते अन् ते त्यानंतर आमदार, मंत्री झालेत. आजही आपल्या बाजूला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ बसले आहेत त्यांनी आमची रस्त्याची समस्या सोडवावी ते आमदार होतील असे सांगितले. यावर दीपक केसरकर यांनी टाळ्या वाजविल्याने शिवसेनेचा आमदारकीचा भावी उमेदवार रुपेश राऊळ असणार अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मंदिरातील बैठकीच्या शेवटी आमदार दीपक केसरकर व सुरेश गावडे यांच्यातील स्मित हास्य यासंदर्भात सुरेश गावडे यांना विचारले असता, सेना प्रवेशाबाबत काही वेळ त्यांनी मौन राखत असे काही नसल्याचे सांगितले. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना विचारले असता, अद्यापक असा कोणताही निर्णय झालेला नसून राजकारणात कधी काही होईल ते सांगता येणार नाही असे सांगून पक्षात येणाऱ्यांचे स्वागतच असल्याचे त्यांनी सांगितले.
