मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर करा ;ग्रामस्थांची मागणी
⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील मसुरे ते डांगमोडे या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्याने डांगमोडे वासीयांनी स्वखर्चाने मसुरे मुस्लिम वाडी येथून डांगमोडे रवळनाथ मंदिरा पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची रविवारी श्रमदानाने डागडुजी केली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपांची तोड करीत हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपावर सुस्थितीत केला आहे
दरम्यान, मसुरे ते डांगमोडे या मंजूर झालेला रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी डांगमोडेवासियांनी केली आहे.
मालवण तालुक्यातील डांगमोडे हे वाडीवजा गाव असून या गावाकडे जाणाऱ्या मसुरे डांगमोडे या रस्त्याचे फार वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली. डांगमोडे गावात जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करत गाव गाठावे लागत असे. गतवर्षी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम शासनाने मंजूर केले. हे काम मंजूर होताच डांगमोडेवासीयांनी समाधानही व्यक्त केले. मात्र, सरकारी काम आणि चार महिने थांब याचा अनुभव या गावातील लोकांना आला. मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम रखडल्याने ऐन गणेशोत्सव काळात या गावातील लोकांना रस्त्यावर पडलेल्या खड्यातून मार्ग काढीत गणेश मूर्ती आणावी लागली होती.
या गावातील ग्रामस्थांनी मसुरे डांगमोडे रस्ता व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, शासनाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्यामुळे या गावातील लोकांनी श्रमदानाने रस्त्याची डागडुजी करण्याचे ठरविले. आणि या गावातील युवा वर्गासह वयोवृद्धांनी तसेच महिलांनीही या कामात सहभाग दर्शवत आपला हातभार लावला. डांगमोडे ग्रामस्थांनी मसुरे मुस्लिम वाडी ते डांगमोडे रवळनाथ मंदिर पर्यंतच्या रस्त्याची डागडुजी श्रमदानाने केली. यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडाझुडपेही तोडून रस्ता खुला केला तसेच रस्त्यावर पडलेले खड्डेही बुजविले. येत्या काही दिवसात डांगमोडे रवळनाथ मंदिर येथून पुढील रस्त्याची डागडुजी श्रमदानाने करण्यात येणार असल्याची माहिती डांगमोडेवासीयांनी दिली आहे.
दरम्यान, मसुरे ते डांगमोडे असा मंजूर झालेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम शासनाने तातडीने हाती घ्यावे अशी मागणी डांगमोडे वासीयांनी केली आहे.
